आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या काळात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला मिळेल मदत, मिशन वात्सल्य अंतर्गत मोहिम
प्रतिनिधी | यावल
‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत समितीमार्फत कार्यालयाच्या मेल आयडीवर तत्काळ माहिती सादर करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ.वनिता सोनकर यांनी केले. त्या ‘मिशन वात्सल्य’ संदर्भात यावल तहसील कार्यालयात झालेल्या तालुका समन्वय समिती व महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त बैठकीत बोलत होत्या.
या बैठकीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ.वनिता सोनकर, तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार, महिला व बालविकास विभागाच्या अर्चना आटोळे, यावल तालुका आरोग्याधिकारी डॉ.हेमंत बऱ्हाटे, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी सरवर तडवी यांच्यासह महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या मुख्य सेविका, अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाकडून बाल न्याय निधीसाठी प्राप्त रकमेचा विनियोग तसेच ‘मिशन वात्सल्य’ योजनेच्या अंमलबजावणी करण्याबाबत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली.
न्यायालयाकडे राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या बाल न्याय निधीमध्ये जिल्ह्यासाठी ८५ लाखांचा निधी प्राप्त झाला. या रकमेबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचना पत्रकात सदर रकमेचा उपयोग ‘कोविड-१९’मुळे एक अथवा दोघे पालक गमावलेल्या बालकांच्या शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क, शैक्षणिक साहित्य खरेदी या उद्देशासाठी करण्यात येईल. एका बालकास एक अथवा अधिक कारणासाठी सहाय्य देता येईल. ते एका बालकास एकाच वेळी देता येईल. त्याशिवाय अन्य कोणत्याही कारणासाठी किंवा सरसकटपणे लाभाची रक्कम वितरित करता येणार नाही. या अर्थसाहाय्याची कमाल मर्यादा १० हजार इतकी आहे. संबंधित बालकांकडून अर्ज व आवश्यक कागदपत्रे मागवून त्यांची यादी जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या बैठकीत सादर हाेईल. समितीची त्यास मान्यता घेणे आवश्यक आहे.
योजनेच्या लाभासाठी असा करावा लागेल अर्ज
अर्जदाराने अर्जासोबत बँक पासबुकची झेरॉक्स, शाळेत दाखल असल्याचा पुरावा आणि कोविडमुळे पालकाचा मृत्यू झाल्याचा अहवाल पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे. एक किंवा दोन पालक, विधवा तसेच एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.