आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरणा धरणाचा ऐतिहासिक विक्रम:गिरणा धरणातून 15 डिसेंबरला सुटेल पहिले आवर्तन; रब्बी हंगाम बहरणार

उमेश बर्गे | चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा पावसाळ्यापासून गिरणा धरणातून सुरू असलेला विसर्ग शनिवारी सकाळी थांबवण्यात आला. धरणाच्या निर्मितीपासून पहिल्यांदाच यंदा तब्बल १४० दिवस धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. त्यात सुमारे ४० हजार दलघफु विसर्ग झाला. म्हणजे गिरणा धरणाच्या क्षमतेचे आणखी दोन धरणे या पाण्याच्या विसर्गाने भरली असती. जळगाव जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या महाकाय गिरणा धरणाचा यंदा हा महाविक्रमच ठरला आहे.

नादगाव तालुक्यात निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागवणारे तसेच २१ हजार ५०० दलघफु क्षमतेचे गिरणा धरण आहे. १ लाख ४१ हजार ३६४ एकर क्षेत्र भिजवण्याची या धरणाची क्षमता आहे. धरणात पुरेसा जलसाठा झाला तर या परिसरातील पाणी चिंता तर मिटतेच, परंतु शेतीलाही मोठा लाभ होतो. त्यामुळे या धरणाच्या जलसाठ्याकडे साऱ्यांच्याच नजरा लागून असतात. यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत धरणात केवळ ३४ टक्के जलसाठा होता. परंतु, नंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरणाची लॉटरी लागली. केवळ पाच दिवसातच धरणाने ३४ टक्क्यांवरून झेप घेत थेट नव्वदी आेलांडली हाेती.

४० हजार दलघफू पाणी वाहिले
धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच जुलैमध्येच उघडलेले दरवाजे जवळपास ६ महिने उघडेच होते. यंदा पावसाळ्यात एकदा तर सहा दरवाजे ३ फुट उचलून त्यातून तब्बल २५ हजार क्युसेस विसर्ग नदीपात्रात सोडला होता. गिरणा धरणाचे १९५९मध्ये बांधकाम सुरू झाले तर १९६९मध्ये बांधकाम पूर्ण झाले.

तेव्हापासून इतिहासात ५५ वर्षात पहिल्यांदाच धरणाचे दरवाजे जुलैमध्ये उघडण्याची वेळ यंदा पहिल्यांदा आली. गिरणा धरणातून १६ जुलैपासून विसर्ग सुरू होता. १ ते २ दरवाजे उघडण्यापासून सहा दरवाजे १ ते ३ फुटाने या काळात उघडले. या काळात आतापर्यंत ४० हजार दलघफू पाणी गिरणा नदीपात्रात सोडले आहे. धरण १०० टक्के भरल्यावर त्यात १८ हजार ५०० दलघफू जिवंत साठा हाेताे. गेल्या १४० दिवसात झालेला विसर्ग लक्षात घेता. धरणातील जल साठ्याच्या दोन पट म्हणजेच २०० टक्के पाणी सोडले. असे एकदाही घडले नाही.

यंदाचे पाच आवर्तने साेडणार
रब्बी हंगामातील सिंचनासाठी तीन व पिण्यासाठी दोन असे पाच आवर्तने यंदा गिरणा धरणातून सुटणार आहेत. त्यातील पहिले आवर्तन आगामी १५ डिसेंबरला सोडण्यात येणार आहे. त्यामुळे गिरणा नदी पुन्हा खळखळून वाहू लागेल. तसेच रब्बी हंगाम देखील बहरणार आहे.'

सलग चाैथ्यांदा शंभरी गाठण्याचा याेग
यंदाही नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने गिरणा धरणात पाण्याची आवक वाढली. त्यामुळे यंदा सलग चाैथ्या वर्षी शंभरी गाठण्याचा योग आला. धरणात ९० टक्क्यांपेक्षा अधिक साठा झाल्याने उप अभियंता हेमंत पाटील यांच्या हस्ते जल पूजन करून १६ जुलैला धरणाचे वक्रद्वार क्रमांक १ व ६ प्रत्येकी १ फुटाने उघडण्यात आले. तेव्हापासून गिरणा धरणातून विसर्ग सुरू आहे. गेल्या १४० दिवसांपासून गिरणेतून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत होता. शनिवारी सकाळी ९ वाजता गिरणा धरणातील सुरू असलेल्या विसर्ग पूर्णतः थांबवण्यात आला.

गिरणा धरणाचा रेकॉर्ड
धरणातून १६ जुलैला दुपारपासून विसर्ग सुरू होता, तो शनिवारी थांबवण्यात आला. या काळात ४० हजार दलघफू पाणी गिरणा नदीपात्रात साेडले आहे. या पाण्याचे प्रमाण धरण साठ्याच्या दोन पट आहे, हा एक रेकॉर्ड आहे.-हेमंत पाटील उपअभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, चाळीसगाव

बातम्या आणखी आहेत...