आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवदान:चार लाखांच्या वर्गणीतून वाचवले जखमीचे प्राण ; पिंप्रीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा पुढाकार

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पिंप्री बु.प्र.दे. येथील तरुण नाशिक येथे अपघातात गंभीर जखमी झाल्याने मृत्यूशी झुंज देत होता. अशा परिस्थितीत पिंप्रीसह परिसरातील ग्रामस्थ त्याला जीवदान देण्यासाठी धावून आले. गावकऱ्यांनी एकजूट दाखवत त्याच्या उपचारासाठी चार लाखांचा निधी जमा करून त्याचे प्राण वाचवले. यातून ग्रामस्थांनी आदर्श निर्माण केला आहे.

गणेश कैलास पाटील (वय २१) हा तरुण काही महिन्यापूर्वी नाशिक येथे कंपनीमध्ये कामाला लागला होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने नाशिकमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी तो कंपनीत काम करत होता. २२ सप्टेंबरला दुपारी गणेश कामाला जात असताना त्याचा अपघात झाला. त्यात गणेशला डोक्याला जबर मार लागल्यामुळे तात्काळ नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नातेवाईकांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. गणेशवर शस्त्रक्रिया करावी लागेल, त्यासाठी पाच ते सहा लाख रुपयांचा खर्च येईल, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे गणेशच्या कुटुंबियांची पायाखालची जमीन सरकली. एवढा खर्च कसा करायचा या विवंचनेत ते पडले. गणेश हा घरातील एकुलता एक मुलगा आहे. त्याचे वडील शेतीकाम करतात. अशी झाली सुरुवात या घटनेची माहिती सैन्य दलात कार्यरत असलेले गणेशचे चुलत भाऊ राहुल नंदू पाटील यांना कळाली. त्यांनी ही माहिती समाज माध्यमात शेअर केली. तसेच जखमी गणेशच्या उपचारासाठी शक्य होईल तितकी मदत जमा करण्याचा प्रयत्न केला. गणेशच्या उपचारासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीने तसेच नोकरदार आणि शेतकऱ्यांनी मदतीचा हात पुढे केल्याने त्याच्यावरील संकट टळले.

येथून मिळाली मदत : ग्रामस्थांची धडपड पाहून परिसरातील शिरसगाव, टाकळी, डोणदिगर, तळोदा, माळशेवगे, देवळीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच फौजी पोलिस बांधव ग्रुप, जय जवान ग्रुप चाळीसगाव, नाशिक, धुळे, सातारा येथून गणेशच्या उपचारासाठी मदत मिळायला सुरुवात झाली. आठ ते दहा दिवसात गणेशच्या उपचारासाठी ३ लाख २० हजारांची मदत झाली. त्यामुळे गणेशवर दोन वेळा डोक्याची शस्त्रक्रिया करणे शक्य झाले. उपचारानंतर गणेशची प्रकृती सुधारल्याने त्याला नुकतिच रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...