आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील मुख्य बाजारपेठ, गंगाघाट, कुंटे रोड परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट बनला आहे. अस्ताव्यस्त पार्किंगमुळे या भागातून पायी चालणे ही कठीण झाले आहे. तालुक्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून या परिसराची ओळख असल्याने, दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक या ठिकाणी येतात. त्यासोबत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य याच परिसरात मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचीही या परिसरात वर्दळ वाढली आहे. मात्र, बाजारात वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बाजारपेठेत गर्दी टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. परंतु बाजारपेठेतील गर्दी पाहता प्रशासन व नागरिकांनी राज्य शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. परिसरात मुख्य बाजारपेठ असल्याने शेकडो वाहने रोज बाजारात साहित्याची ने-आण करतात. ही अवजड वाहने बाजारातून नेताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे सकाळी किंवा रात्री अवजड वाहनांना येथे प्रवेश दिला जातो. गावातून फळे, भाजीपाला, कपडे व कृषी साहित्य घेण्यासाठी येणारे नागरिक आपली दुचाकी वाहने बेशिस्तपणे उभी करतात. त्यामुळे पायी चालणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.
फुटपाथ उभारण्याचा विसर पालिकेने शहरातून जाणाऱ्या काही मुख्य रस्त्यावर फुटपाथाची निर्मिती केली आहे. मात्र, प्रशासनाने बाजारातील गर्दीची समस्या लक्षात घेता फुटपाथ उभारणे आवश्यक होते. मुख्य रस्त्यांवर दुभाजक टाकले असले तरी बाजारपेठेतील गर्दी व बेशिस्त पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी फुटपाथ असणे गरजेचे आहे.
पोलिसांनी लावावी शिस्त शहरातील मुख्य बाजारपेठ, कुंटे रोड, भागवत गल्ली, गंगाघट, कोंबडी बाजार, पाच पावली देवी मंदिर परिसर व इतर ठिकाणी बेशिस्तपणे दुचाकी वाहने लावली जातात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. पालिकेच्या अतिक्रमण विभागाने आणि वाहतूक शाखेने बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावल्यास ही समस्या सुटू शकते.
दंडात्मक कारवाई करणार ^कोरोना काळात सामाजिक अंतर ठेवण्यासाठी हातगाडीवरील विक्रेत्यांना जागा देण्यात आली होती. परंतु त्यांनी ती जागा सांभाळून घेतलेली आहे. ती जागा फक्त वाहन पार्किंगसाठी आहे. त्याठिकाणी असणाऱ्या व्यवसायिकांना पालिकेतर्फे अन्यत्र जागा उपलब्ध करून देण्यात येईल. पालिकेचे अतिक्रमण पथक आणि वाहतूक पोलिसांची मदत घेऊन बेशिस्त वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी, अमळनेर
माजी आमदार साहेबराव पाटील यांनी लावली होती शिस्त माजी आमदार साहेबराव पाटील यांनी शहरातील सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करून, दुभाजकांची उभारणी केली होती. मात्र कुंटे रोडवरील कोंडीची समस्या सोडवण्यासाठी त्यावेळी रस्त्यावर दुभाजक न टाकता ती जागा बाजारात येणाऱ्या नागरिकांना, दुचाकी पार्किंगसाठी सोडली होती. सुरूवातीला नागरिकांनी त्या जागेचा चांगला वापर केला. मात्र, नंतर पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.