आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसंपदा / उमेश बर्गे:गिरणा धरणातील गाळ काढणार,7 ते 10 टक्क्यांनी वाढणार साठा

चाळीसगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्ह्याला वरदान ठरलेल्या गिरणा धरणातील गाळ आगामी काळात काढण्यात येणार आहे. राज्यातील गिरणासह उजनी, गोसीखुर्द, जायकवाडी आणि मुळा या पाच धरणांमध्ये साठलेला गाळ काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गिरणा धरणात सध्या ७ ते १० टक्के गाळ आहे. निर्मितीनंतर प्रथमच धरणातील गाळ काढला जाणार आहे. त्यामुळे जलसाठ्यात ७ ते १० टक्के वाढ हाेईल.

नाशिक जिल्ह्यातील गिरणासह सोलापूर जिल्ह्यातील उजनी, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द, औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी आणि पुणे जिल्ह्यातील मुळा या पाच धरणांमधील गाळ काढण्याचा निर्णय पाच ते सहा वर्षांपुर्वी घेण्यात अाला हाेता. तेव्हापासून याबाबत प्रक्रिया सुरू अाहे. नाशिक येथील मेरी संस्थेकडून गिरणा धरणाचे सर्वेक्षण केले गेले होते. त्यात गिरणा धरणात ७ टक्के गाळ असल्याचे आढळून आले होते. धरणाच्या आजुबाजूला २० फुटापर्यंत गाळ जमा झाला आहे. धरणाच्या मध्यभागी गाळ कमी आहे. त्यामुळे गिरणा धरणाची साठवण क्षमता पुनर्स्थापित करण्यासाठी धरणातील गाळ व गाळमिश्रित वाळू यंत्र सामग्रीद्वारे काढण्याचे नियाेजन आहे.

धरण परिसरात २० फुट गाळ, रेती : गिरणा हे दगडी धरण म्हणूनही ओळखले जाते. धरणाची एकूण लांबी ४२६.७२ मीटर, तर साठवण क्षमता २१ हजार ५०० दलघफू आहे. धरणाची जिंवत साठ्याची क्षमता १८ हजार ५०० दलघफू असून, मृसाठा ३ हजार दलघफू आहे. धरणावर जामदा डावा कालवा, जामदा उजवा कालवा, निम्न गिरणा कालवा, पांझण डावा कालवा हे चार कालवे तयार करण्यात आले आहेत. ५६.३६ किमी लांबीच्या जामदा डाव्या कालव्यामुळे चाळीसगाव, भडगाव व पारोळा तालुक्यांना फायदा होतो. ३२.१८ किमी लांबीच्या जामदा उजवा कालव्यामुळे चाळीसगाव, भडगाव व एरंडोल तालुक्यातील गावांना लाभ होतो. ४५.०५ किमी लांबीच्या निम्न गिरणा कालव्यामुळे एरंडोल व अमळनेर तालुक्याला लाभ होतो. ५३.२० किमी लांबीच्या पांझण डावा कालव्यामुळे मालेगाव, धुळे, चाळीसगाव व भडगाव या भागातील गावांना फायदा होतो. गिरणा धरणात सध्या धरणात ९२ टक्के साठा अाहे.

समिती सुधारित मानक प्रारुप तयार करणार
गिरणासह राज्यातील पाच धरणांमध्ये साठलेला गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, या कामासाठी मागवण्यात येणाऱ्या निविदांचे सुधारीत मानक प्रारूप तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आली आहे. ही समिती दोन महिन्यात आपला अहवाल शासनला सादर करेल. त्यानंतर गाळ काढण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे.

गिरणात धरणात ७ टक्के गाळ साचला
काही वर्षांपुर्वी गिरणा धरणाचे नाशिक येथील मेरी संस्थेकडून सर्वेक्षण केले गेले होते. सर्वेक्षणात धरणात क्षमतेच्या ७ टक्के गाळ असल्याचे दिसुन आले. गिरणा धरणात सध्या ७ ते १० टक्के इतका गाळ आहे. हा गाळ काढण्याचा निर्णय झाल्यास जेवढा गाळ काढला जाईल तेवढा पाणीसाठा भविष्यात वाढेल.
हेमंत पाटील, उपअभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, चाळीसगाव

बातम्या आणखी आहेत...