आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजीवनी:बहाळ येथील शेतकऱ्यांसाठी पोखरा योजना ठरली संजीवनी

बहाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदीच्या काठावर वसलेले व फळबागांसाठी प्रसिद्ध असलेल्या बहाळ येथील शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजना संजीवनी ठरली आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत येथील १४४५ शेतकऱ्यांना मिळाला असून अद्याप २१५ शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रतीक्षेत आहेत.

शेतीला आणि शेतकऱ्यांना बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी सक्षम करणे हा या प्रकल्पाचा उद्देश असून त्या दिशेने अंमलबजावणीमुळे योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. योजनेची सुरुवात २०१९ मध्ये झाली. जिल्ह्यात पोखरा योजनेचे ५१ हजार ९९४ लाभार्थी असून त्यांना आतापर्यंत ३३९ कोटी ३६ लाख रुपये इतका निधी वितरीत झाला आहे. चाळीसगाव तालुक्यातील ५२ गावांचा समावेश असून त्यात बहाळ गावाला या याेजनेचा सर्वाधिक लाभ मिळाला आहे. यात ठिबक संच ६२०, फळबाग ८३, वीजपंप ४६१, पाइप २८१ अशा एकूण १ हजार ४४५ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. शेतीसंबंधी लाभापोटी डीबीटीद्वारे तालुक्यातील ९ हजार ९७० लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम थेट वितरीत झाली आहे..

या योजनेअंतर्गत ठिबक सिंचनाला विशेष प्राधान्य दिले होते. त्याचा सर्वाधिक ६२१ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. या योजनेतून तीन लाभार्थ्यांना शेडनेटचा लाभ मिळाला. एका लाभार्थ्यास १८ लाख ६५ हजारांचे अनुदान देण्यात येते. तरी गरजूंनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी सहायक रमेश सांगळे यांनी केले आहे. पोखरा योजनेचा लाभ घेऊन जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगतीचा मार्ग शोधला आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनीदेखील या योजनेचा लाभ घ्यावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी याेजनेचा लाभ घ्यावा
शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी पोखरा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा तसेच जिल्ह्यात ५१ हजार ६९४ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. त्यातून खऱ्या अर्थाने शेतकरी आधुनिकतेकडे वळणार असून उत्पन्न वाढीसाठी पोखरा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार उन्मेष पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

बातम्या आणखी आहेत...