आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हालचालींना वेग:राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थगित निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा सुरू

चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत व सहकारी संस्थांच्या निवडणूका एकाच कालावधीत येत असल्याने सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, अलीकडेच सहकारी संस्थांच्या निवडणुका त्वरीत घेण्याचे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने दिल्याने स्थगित झालेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम पुन्हा सुरू होणार आहे. त्यात चाळीसगावसह तीन तालुक्यात विस्तार असलेल्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचा समावेश आहे.

यात नवीन कार्यक्रमानुसार २१ ते २६ डिसेंबर दरम्यान माघारीची मुदत असून २७ रोजी उमेदवारांना चिन्ह वाटपासह अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. तर ८ जानेवारीला मतदान तर ९ रोजी मतमोजणी हाेणार आहे. यामुळे निवडणूक हालचालींना वेग येणार आहे. तालुक्यातील मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक गेल्या ३६ महिन्यात तिसऱ्यांदा पुढे ढकलली होती. दरम्यान, सन २०२०मध्येच संचालक मंडळाची मुदत संपली. आधी कोरोनानंतर अतिवृष्टीचे कारण देत ही निवडणुक पुढे ढकलली.

सध्या या संस्थेची निवडणूक प्रक्रिया अंतीम टप्प्यात आली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपली होती. १९ जागांसाठी १३७ उमेदवार रिंगणात होते. तर ५ डिसेंबरला माघारीच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार होते. मात्र, राज्यात सहकारी संस्था व ग्रामपंचायत निवडणूका एकाच काळात होत असल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना २० डिसेंबरपर्यंत ब्रेक लागला होता. राष्ट्रीय सहकारी संस्थेची निवडणूक आहे, त्या स्थितीत पुढे ढकलण्यात आली होती.

मातब्बर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने चुरस
इच्छुक उमेदवारांकडून प्रचाराला सुरूवात झाली आहे. त्यात संस्थेचे सचिव अरूण निकम यांच्या पॅनलसह विरोधी डॉ. विनायक चव्हाण यांच्या पॅनलमध्ये उमेदवारांची निश्चित जवळपास झाल्याची चर्चा आहे. या संस्थेच्या निवडणुकीसाठी खासदार उमेश पाटील यांचे वडील भैयासाहेब पाटील यांनी ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे तालुक्यातील लोकप्रतिनिधी ही अप्रत्यक्षपणे या निवडणुकीत सहभागी झाल्याचे चित्र आहे.

माघार प्रक्रियेपासून हाेणार सुरुवात
या निवडणुकीत १९ जागांसाठी १३७ उमेदवार रिंगणात आहेत. आता २१ ते २६ डिसेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर पात्र उमेदवारांना चिन्ह वाटप होवून अंतिम उमेदवारांची यादी २७ डिसेंबरला प्रसिद्ध होईल. तर ८ जानेवारीला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळात मतदान होईल. ९ जानेवारीला मतमोजणी होईल. तर निवडणुक कार्यक्रम जाहीर होताच इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत.

छाननीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका तत्काळ घेण्याचे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने अलीकडेच एका याचिकेसंबंधी दिले होते. त्यात राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचा ही समावेश होता. या संस्थेची १८ डिसेंबरला निवडणूक होती. याच दिवशी तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या ही निवडणुका आहेत. राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाची उमेदवारी अर्ज दाखल ते छाननी पर्यंतची प्रक्रिया झालेली होती.

माघारीकडे लक्ष : गेल्या निवडणुकीत यशवंत व परिवर्तन या दोन पॅनलमध्ये मुख्य लढत झाली होती. त्यात परिवर्तन पॅनलने बाजी मारली होती. परिवर्तनला ११ तर यशवंत पॅनलला ८ जागा मिळाल्या होत्या. यंदाही दोन पॅनलची जुळवाजुळव जवळपास निश्चित झाली असून किती अपक्ष मैदानात उरतात? याची उत्सुकता आहे. तर आता माघारीकडे लक्ष लागून आहे.

बातम्या आणखी आहेत...