आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष साहाय्य योजना:निराधारांची दाखल्यांसाठी धावाधाव; तहसील कार्यालय, सुविधा केंद्रांवर लांबच लांब रांगा

चाळीसगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तालुक्यात ३१ हजार २०० लाभार्थी; उत्पन्नाचा दाखला दरवर्षी देणे बंधनकारक

विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला मिळाल्याशिवाय लाभ मिळणार नाही, असे परिपत्रक शासनाने काढले आहे. यामुळे या योजनांच्या लाभार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. उत्पन्नाचा दाखला मिळवून तो संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेत जमा करण्यासाठी या लाभार्थ्यांची तहसील कार्यालयात व सुविधा केंद्रावर गर्दी होत आहे. गुरूवारी तर हे दाखले काढून जमा करण्यासाठी लाभार्थ्यांची सुविधा केंद्रावर लांबच रांगच रांग लागली होती. या योजनांचे तालुक्यात ३१ हजार २०० लाभार्थी आहेत.

चाळीसगाव तहसील कार्यालयामार्फत विशेष सहाय्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ निवृत्ती योजना अंतर्गत विविध योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करून बँक मार्फत लाभार्थ्यांना ते वाटप करण्यात येते. तालुक्यातील गरिबांना संजय गांधी निराधार, श्रावण बाळ सेवा व इंदिरा गांधी निराधार योजना मोठ्या आधार ठरल्या आहेत. या योजनेच्या विशेष सहाय्य निधीतून हजारो लोकांच्या घरात चुली पेटत आहेत. दरम्यान, शासनाच्या परिपत्रकानुसार विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून महिन्यात २१ हजारांचा उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना शाखेत जमा करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. लाभार्थ्याने त्याच वर्षाच्या १ जुलै ते ३० सप्टेंबर या काळात उत्पन्नाचा दाखला सादर केल्यास प्रकरणातील अपरिहार्यता, अपवादात्मक परिस्थिती विचारात घेऊन लाभार्थ्याचे बंद केेलेेले अनुदान पूर्ववत करण्यात येईल, अशा सूचना तहसीलदार अमोल मोरे यांनी दिल्या आहेत.

वृद्ध, दिव्यांगांची होतेय दमछाक
या योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून लाभार्थ्यांची उत्पन्नाचे दाखले मिळवून ते संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेत जमा करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून धावपळ सुरू आहे. ३० जूनपर्यंत हे दाखले सादर करणे अनिवार्य आहे. लाभार्थ्यांची २१ हजारांचा उत्पन्नाचा दाखला, हयातीचे घोषणा पत्र, बँक पासबुक व आधार कार्डाची झेरॉक्स अशी कागदपत्रे जुळवाजुळव करण्यासाठी तीन ते चार दिवस त्यांना तलाठी व तहसीलदार कार्यालयात पायपीट करावी लागत आहे. यामुळे वृद्ध व दिव्यांगांची दमछाक होत आहे. गुरुवारी तहसीलबाहेर गर्दी झाली होती.

गांधी निराधार योजनेचे १७ हजार लाभार्थी
चाळीसगाव तालुक्यात ३१ हजार लाभार्थी आहेत. या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे ५ हजार ४९०, श्रावण बाळ सेवा योजनेचे ८ हजार ७०० तर इंदिरा गांधी निराधार योजनेचे १७ हजार लाभार्थी आहेत. त्यामुळे सध्या लाभार्थ्यांची गर्दी होत आहे. प्रशासनाने गैरसोय टाळावी.

लाभार्थ्यांनी प्रशासनास सहकार्य करावे
शासन निर्णयानुसार चाळीसगाव तालुक्यातील जे नागरिक संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अशा योजनांचा लाभ घेत असतील त्यांनी या सूचनांचे पालन करावे. तहसील कार्यालयात संजय गांधी योजना शाखेत आपला यंदाचा उत्पन्नाचा दाखला जमा करून प्रशासनास सहकार्य करावे. या सूचनांच्या अनुषंगाने उत्पन्नाचा दाखला या कार्यालयाकडे विहित मुदतीत जमा न केल्यास आपले अनुदान बंद करण्यात येईल. हे अनुदान बंद झाल्यास त्यास तहसील कार्यालय जबाबदार राहणार नाही.
अमोल मोरे, तहसीलदार