आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सततच्या पावसामुळे पिके पडली पिवळी:चाळीसगावातील स्थिती गिरणा काठावर मुसळधार ; तर बहाळ परिसर तहानला

उमेश बर्गे | चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील काही भागात अत्यल्प पावसामुळे तर काही भागात अतपिावसामुळे पिकांना माेठा फटका बसला आहे. गिरणाकाठ परिसरात सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडत आहेत. तर दुसरीकडे काही भागात अत्यल्प पावसामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाळ्याचा अखेरचा टप्पा येऊनही केवळ ५०८.९४ मिमी पाऊस झाला असून त्यातील ७१.८३ मिमी पाऊस गेल्या ६ दिवसात पडला आहे.

तालुक्यात दरवर्षी ७०० मिमी पाऊस होताे. गतवर्षी तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने हाहाकार माजला होता. तालुक्यात सुमारे एक हजार मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला हाेता. परिणामी सुमारे ७० हजार हेक्टर क्षेत्रातील पिके अतिवृष्टीत वाहून गेली होती. गेल्यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने यंदा शेतकरी गेल्यावर्षीचे नुकसान भरून काढण्यासाठी खरीप हंगामाच्या कामांना लागले होते. चाळीसगाव तालुक्यात ८८ हजार १९४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून, यंदा त्यापैकी सर्वाधिक ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली. त्याखालोखाल बाजरी आहे.

अर्धा चाळीसगाव तालुका दुष्काळाच्या छायेत
जूनच्या सुरवातीपासून पावसाला सुरूवात झाली. मात्र नंतर पावसाने लहरीपणा दाखवत शेतकऱ्यांना निराश केले. श्रावणात पावसाची झडी लागत असताना यंदा मात्र श्रावणात उन्हाचे चटके जाणवत होते. पावसाचे तीन महिने उलटले तरी तालुक्यात नदीनाले वाहून निघाले नाही. त्यामुळे विहरींची पाणी पातळी खालावली आहे. गेल्या चार दिवसात झालेल्या थाेड्याफार पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तरी वाढ ही खुंटली आहे. तळेगाव, हातगाव, हिरापूर, शिरसगाव, टाकळी, पिलखोड, देवळी, आडगाव हा परिसर दुष्काळाच्या छायेत आहे.

पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
दुसरीकडे तालुक्यातील गिरणाकाठ भागात गेल्या आठवड्यापासून दररोज सायंकाळी पाऊस होत आहे.

सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडली आहेत. पिकांमध्ये अद्यापही पाणी साचल्याचे दिसून येत आहे. कोवळ्या पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मेहुणबारे, वडगाव लांबे, भऊर, दरेगाव, लोंढे भागात हे चित्र आहे.

पिकांची वाढ खुंटली
गेल्या चार दिवसात झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी पिकांना ताण बसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. तालुक्यात पिकांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
विवेक रणदिवे, शेतकरी, देवळी

​​​​​​​पिके कुजू लागली
गेल्या आठवड्यापासून दरारोज सायकांळी पाऊस होत असून सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडली आहेत. अति पावसामुळे जमिनीत असलेल्या पिकांची मुळे कुजत आहेत. पिके वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे.
शिवाजी पाटील, शेतकरी, लोढे​​​​​​​​​​​​​​

बातम्या आणखी आहेत...