आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातून वाहणाऱ्या तितूर व डोंगरी नदी पात्रांची लोकसहभागातून स्वच्छता केल्यानंतर पालिकेकडून नदीपात्रासह शहरातील रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा ठरणारे जवळपास २०० लहान-मोठ्या टपऱ्या व दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले. गेल्या १५ दिवसांपासून ही मोहीम सुरू आहे. दुसरीकडे अतिक्रमणामधून काढलेल्या काही टपऱ्या प्लॉटधारकांच्या मोकळ्या जागेत ठेवण्याचा प्रकारही समोर आला आहे. याबाबत पालिकेकडे तक्रार करण्यात आली असून असा प्रकार कोणी केल्यास संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा पालिकेकडून देण्यात आला.
लोकसहभागातून नुकतेच डोंगरी व तितूर नदीची स्वच्छता करण्यात आली. तसेच नदीपात्रातील अतिक्रमणही काढण्यात आले. त्यामुळे डोंगरी व तितूर नदी पात्रांचा कायापालट झाला आहे. गेल्यावर्षी नदीपात्रात झालेले अतिक्रमण व साचलेली घाण यामुळे दोन महिन्यात तब्बल सात पूर आले होते. त्यामुळे यंदा पालिकेने पावसाळ्यापूर्वी ‘अलर्ट’ होत मोहीम सुरू केली. सुरुवातीला नगरपालिकेने नदीपात्रातील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली. दुसऱ्या टप्प्यात भाजी मंडई पूल, शहरातील नागद रोड, करगाव रोड अंधशाळा, शिवाजी महाराज पुतळा ते रेल्वे उड्डाण पुल, चाळीसगाव महाविद्यालय वाय पॉइंट व हिरापूर रोड, दर्गा परिसर या भागातील शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे तसेच नदीपात्रातील जवळपास २०० लहान-माेठ्या टपऱ्यांचे अतिक्रमण काढण्यात आले.
कारवाईचे शहरवासीयांकडून स्वागत : सुमारे १५ दिवसांपासून ही मोहीम शहरात राबवली जात आहे. मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर अभियंता प्रदीप धनके, दीपक देशमुख, प्रेमसिंग राजपूत, भूषण लाटे यांच्यासह पालिकेच्या पथकाकडून ही कारवाई सुरू आहे. यात पालिकेचे ५० अधिकारी व कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील १०० कर्मचारी, जेसीबी ट्रॅक्टर यांच्यामार्फत ही मोहीम राबवली जात आहे. पालिकेच्या या कारवाईचे शहरवासीयांकडून स्वागत होत आहे. तसेच पूर्ण अतिक्रमण निर्मूलनाची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
मध्यरात्री प्लॉट समोर टपरी ठेवून अतिक्रमण; पालिकेकडे तक्रार
दरम्यान पालिकेने अनेक टपऱ्यांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई पालिकेने केली. मात्र शहरातील काही प्लॉटमध्ये या अतिक्रमित टपऱ्या रात्री-बेरात्री ठेवण्याचा प्रकार सुरू आहे. हिरापूर रोड भागातील स्वरूप प्रकाश देशमुख यांनी पालिकेकेडे लेखी तक्रार दिली. त्यात म्हटले आहे की, हिरापूर रोडवरील बीज गुणन केंद्रासमोर आपला प्लॉट असून ११ रोजी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने टपरी ठेवून अतिक्रमण केले. त्यामुळे आपल्या प्लॉटमधून वापरण्यास अडचण निर्माण झाली आहे. ही टपरी पिरनवाडीतील रहिवाशांच्या वापराच्या रस्त्यावरही अडचणीची ठरत असल्याने या टपरीचे अतिक्रमण हटवून प्लॉट समोरील रस्ता व जागा मोकळी करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अतिक्रमण करणाऱ्यांविरोधातही कारवाई
असा काही प्रकार कोणी करत असेल तर संबंधितांनी नगरपालिकेला कळवावे अथवा पालिकेकडे तक्रार करावी. अशी अतिक्रमणे करणाऱ्यांच्या विरोधात तत्काळ कारवाई केली जाईल. - प्रदीप धनके, नगर अभियंता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.