आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारोळ्यात थरार:शेतकऱ्याची रोकड हिसकावणाऱ्या चोरट्यांशी युवकाने केले दोनहात

मुंदाणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारोळा येथील बँकेतून ८३ हजारांची रोकड काढून दुचाकीने गावाकडे येणाऱ्या शेतकऱ्याचे पैसे, तीन चोरट्यांनी वाटेत हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या शेतकऱ्याच्या मदतीला दुसरा युवक धावून आल्याने, तिघा चोरट्यांनी पलायन केले. चोरवड नाका येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली.

तालुक्यातील टिटवी येथील शेतकरी सोमनाथ महाजन हे पारोळा येथील स्टेट बँक शाखेत गेले होते. रोख ८३ हजार रुपये काढून दुचाकीने ते एका सहकाऱ्यासोबत गावाकडे यायला निघाले होते. वाटेत चोरवड नाका येथे, दुचाकीचा वेग कमी असताना, एका अल्पवयीन चोरट्याने दुचाकीच्या डिक्कीतून पैशांची पिशवी अलगद काढून घेतली. हा प्रकार शेतकरी सोमनाथ महाजन यांच्या लक्षात आला नाही. ते पुढे निघून गेले. मात्र, त्यांच्यामागे दुसऱ्या दुचाकीवर त्यांच्याच गावातील घन:श्याम छोटुलाल महाजन हा युवक येत होता. त्याला चोरीची घटना निदर्शनास आल्याने, त्याने काही अंतरावर अल्पवयीन चोरट्याकडून पैशांची पिशवी हिसकावली. त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी ती पिशवी घन:श्यामकडून हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिक धावून आले. तिघे चोरटे पैशांची पिशवी सोडून पसार झाले.

बँकेत जाताना अशी सावधगिरी बाळगा
नागरिकांनी बँकेतून रोकड काढताना एकट्याने जाऊ नये. शक्यतो रोकड जाड पिशवीत ठेवून ती पिशवी आपल्या नजरेसमोर हातात ठेवावी. बँकेतून बाहेर पडताना आपल्यावर कुणी नजर ठेवत असल्यास त्यांची माहिती पोलिसांना कळवावी. तसेच बँकेत स्लीप भरण्यासाठी तसेच एटीएममध्ये कोणाचिही मदत घेऊ नये.

ब्लेडचा वार चुकवला
शेतकरी सोमनाथ महाजन यांची दुचाकी माझ्यापुढे चालत होती. त्यांच्या दुचाकीचा वेग कमी असताना मागील कापडी डिक्कीतून एका अल्पवयीन चोरट्याने पैशांची पिशवी अलगद काढून घेतली. अल्पवयीन पळून जात असताना पिशवून नोटांचे एक बंडल खाली पडले. त्यामुळे मला घटना समजली. त्यानंतर दुचाकी जागीच उभी करून मी त्या अल्पवयीन चोरट्याचा पाठलाग केला. वाटेतील वखारीजवळ मी त्याला पकडले. त्याचवेळी मागून दुचाकीवर त्याचे दोन साथीदार आले. त्यापैकी एकाने माझ्या पोटावर ब्लेडने तीन वार केले. सुदैवाने मला मोठी इजा झाली नाही मात्र शर्ट फाटले. नागरीक धावून आल्याने चोरटे पसार झाले, अशी आपबिती घन:श्यामने सांगितली.

बातम्या आणखी आहेत...