आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुवकाच्या सतर्कतेमुळे चोरट्याचा बँक फोडण्याचा प्रयत्न फसला. वरखेडी (ता.पाचोरा) येथे रविवारी पहाटे ३.३० वाजता ही घटना घडली. या घटनेत धाडसी युवक सागर अशोक चौधरी (रा.वरखेडी) याने चोरट्याशी झटापट केली. घटनेत चोरटा पसार झाला आहे.
वरखेडी येथील सागर चौधरी याचे वडील अशोक यादव चौधरी यांची प्रकृती बिघडल्याने, सागर वडीलांना घेऊन पहाटे ३.३० वाजता डॉक्टरांकडे दुचाकीवर निघाला होता. वाटेत बँक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोरुन जातांना सागरची नजर सहज बँकेकडे गेली. त्यावेळी बँकेसमोर तोंडाला रुमाल बांधलेला एक युवक फिरताना त्याला दिसला. संशयिताची चौकशी करण्यासाठी सागर त्याच्याकडे जाताच, चोरट्याने हातातील टॉमीने सागरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु सागरने वार चुकवला. तसेच चोरट्यासोबत त्याची झटापट झाली. मात्र, चोरटा आपली दुचाकी (क्र.एम.एच.१९/टी. १८०८), टॉमी आणि हातोडा असे साहित्य सोडून पसार झाला.
बॅँक व्यवस्थापक नॉट रिचेबल
रविवारी सुटीचा दिवस असल्यामुळे बँकेचे शाखा व्यवस्थापक किंवा इतर कर्मच्याऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. या घटनेच्या तपासात बँकेतून सीसीटीव्ही फुटेज त्वरित मिळाले असते, तर चोरट्याचा शोध घेणे सोपे झाले असते. परंतु सुटी असल्याने बँके व्यवस्थापक बाहेरगावी होते. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत साहित्य जप्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.