आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रामाणिकपणा:रस्त्यावर पडलेल्या पिशवीतील लाख रुपये युवकांनी केले परत ; दोघांनी पैसे आपलेच असल्याचा केला होता कांगावा

अमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील एक ठिबक व्यावसायिक बँकेतून काढलेले पैसे दुचाकीने घेवून जाताना पिशवीच्या नाड्या तुटून खाली पडले. या पिशवीत सुमारे १ लाख १२ हजार रुपये होते. दरम्यान, या दुचाकी मागून येणाऱ्या एका तरुणास ही पिशवी सापडली. पोलिसांच्या मदतीने सीसीटीव्ही कॅमेरे तपासून ती पिशवी व रक्कम या तरुणाने मूळ मालकाला परत दिली आहे. याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तालुक्यातील शिरूड येथील रहिवासी व ठिबक विक्रेते बापूराव भिवसन महाजन हे ठिबकचे पैसे कंपनीकडे पाठवायचे असल्याने पारोळ्याहून जवळपास १ लाख १२ हजार रुपये घेऊन सेंट्रल बँकेच्या परिसरातून दुचाकीने जात होते. दुचाकीला लावलेल्या पिशवीत त्यांनी हे पैसे ठेवले होते. या पिशवीच्या ३ रोजी दुपारी नाड्या तुटल्या व पिशवी रस्त्यावर पडली. मात्र, बापूराव महाजन यांच्या लक्षात न आल्याने ते पुढे निघून गेले. मात्र, काही वेळाने तेथे शहरातील श्रीनाथ पाटील हा तरुण आला. त्याला रस्त्यावर पडलेली पिशवी दिसली व त्यातून बाहेर आलेली नोट पाहून त्याने ही पिशवी उचलली. तपासून पाहिले असता त्यात आणखी पैसे आढळले. तेथेच उभ्या असलेल्या एका जोडप्याला हा प्रकार समजताच त्यांनी आमचे पैसे हरवल्याचा कांगावा सुरू केला. मात्र, श्रीनाथ पाटीलने त्यांना पिशवीत किती पैसे आहेत, हे विचारल्यावर त्यांनी १० हजार रुपये असल्याचे सांगितले. मात्र, पिशवीत पैसे जास्त असल्याने श्रीनाथ पाटील यांनी पोलिस ठाण्यात जाऊन तेथून खात्री करून पैसे तुमचे घेऊन जा, असे सांगितले व ते तेथून निघून गेले. श्रीनाथ पाटील यांनी हा सर्व प्रकार जितेंद्र ठाकूर यांना सांगितला. त्यांनी घटनास्थळी पोहोचून सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकांना सर्व प्रकार सांगितला. त्याच वेळी आणखी दुसऱ्या व्यक्तीने कांगावा करत माझे तीन लाख रुपये हरवल्याचे सांगितले. मात्र, त्याचा हेतू ओळखून श्रीनाथ पाटील व जितेंद्र ठाकूर यांनी मूळ मालकाला शोधण्यासाठी रक्कम स्वतःजवळ ठेवून घेतली.

दोघांचा सत्कार : सायंकाळी बापूराव महाजन व प्रा. सुभाष पाटील यांनी अमळनेर पोलिस स्थानकात जाऊन पैसे हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून रक्कम मूळ मालकाला परत केली. श्रीनाथ पाटील व जितेंद्र ठाकूर यांनी दोन्ही व्यक्तींचा कांगावा ओळखून सापडलेली रक्कम मूळ मालकाला परत केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रा. सुभाष पाटील, सचिन पाटील, चंद्रकांत काटे, गौरव पाटील, राजेंद्र देशमुख उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...