आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट:सात्रीला नदीचा वेढा पडल्याने रस्ताच नाही, महिलेचा उपचाराअभावी मृत्यू

पाडळसरे / वसंतराव पाटील2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर तालुक्यातील सात्री गावाला बाेरी नदी व खैऱ्या नाल्याने वेढले आहे. त्यामुळे पावसाळ्यात चार महिने या गावाचा दरवर्षीच संपर्क तुटताे. याच कारणामुळे गतवर्षी उपचाराअभावी ११ वर्षीय आरुषीचा मृत्यू झाला हाेता. त्यावेळी ग्रामस्थांनी आंदाेलन केल्यानंतर प्रशासनाने तत्काळ उपाययाेजना करण्याचे आश्वासन दिले. परंतु, वर्ष उलटूनही काेणतीच दखल घेतली नाही. परिणामी वेळीच उपचार करता न आल्याने ५३ वर्षीय महिलेचा दसऱ्यालाच मृत्यू झाला. ग्रामस्थ आक्रमक झाले. पुन्हा प्रशासनाने तत्काळ पर्यायी व्यवस्था करण्याची ग्वाही दिली. परंतु, ग्रामस्थांची न्याय मागणीला कधी न्याय मिळेल का अजून किती जीव घेतल्यानंतर प्रशासन जागे हाेईल, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला. ५ रोजी पहाटे ३ वाजता उषाबाई रामलाल भील (वय ५३) या महिलेच्या छातीत कळा आल्या व उलट्या सुरू झाल्या. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतरही बोरी नदीला पाणी असल्याने कुटुंबीय व ग्रामस्थांना त्यांना बैलगाडीवर नेता आले नाहीत. दिवस उजाडल्यावर साडीच्या झोडीतून सुमारे १२ ग्रामस्थांनी नदी पार करत अमळनेर गाठले. तोवर उषाबाईंची प्रकृती खालावली होती. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयातील दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

यानंतर ग्रामस्थांनी प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. दरम्यान, ही माहिती पुनर्वसन समितीचे सदस्य महेंद्र बोरसे यांना ग्रामस्थांनी दिली. त्यानंतर प्रशासन पर्यायी व्यवस्था करत नाही म्हणून मृत उषाबाईंचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला. प्रशासनाला ही माहिती मिळताच तहसीलदार मिलिंद वाघ व प्रांत सीमा अहिरे यांनी ग्रामीण रुग्णालय गाठून नागरिकांची समजूत घातली. महेंद्र बोरसे यांनी प्रशासनावर रोष व्यक्त करुन तहसील कार्यालयात बोट प्रदर्शनाला ठेवली का, अशी भावना व्यक्त केली. शेवटी महेंद्र बोरसे यांच्याशी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचे बोलणी करून देण्यात आली. आगामी १२ तारखेला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत पुनर्वसन व भूसंपादनाबाबत पर्यायी व्यवस्था करण्यासाठी बैठक घेण्याचे लेखी पत्र प्रांत अहिरे यांनी दिले. तर आश्वासनानंतर उषाबाईंचा मृतदेहावर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत उषाबाई यांच्या पश्चात पती, १ मुलगा, २ मुली, सून असा परिवार आहे.

समन्वय नसल्याने बोट अमळनेर नगरपालिकेत वापराविना पडून प्रशासन म्हणते अमळनेर नगरपालिकेत बोट आणली आहे. मात्र, प्रशासनाने बोट उपलब्ध असल्याचे ग्रामपंचायतीला कळवले नाही. १७ किमी वरून बोट आणि कर्मचारी उपलब्ध करण्यासाठी किमान तास दीड तास लागतो. प्रशासनाने आणखी एक बळी घेतला. मागील वर्षी सात्री ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात आरुषीचा मृतदेह आणल्याने त्यावेळी अत्यावश्यक म्हणून बोटीचा पर्यायी मार्ग निवडला हाेता. मात्र, तो तात्पुरता असल्याने संताप व्यक्त होत आहे.

गेल्यावर्षी सात सप्टेंबर रोजी ११ वर्षांच्या आरुषीचा घेतला बळी गेल्या वर्षी सात सप्टेंबर रोजी याच संकटामुळे आरुषी या ११ वर्षीय आदिवासी बालिकेचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. तरीही प्रशासनाला जाग आली नाही. वर्षभर काहीच उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळेच वृद्ध महिलेचा जीव गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आता तरी प्रशासनाचे डोळे उघडतील का? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

तत्काळ पर्यायी व्यवस्था न झाल्यास तहसीलदार कार्यालयातच मंुडण करू तालुका व जिल्हा प्रशासनाने सात्रीच्या पुनर्वसनासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, तांत्रिक अडचणी लवचिक करून रस्त्याची पर्यायी व्यवस्था करून त्वरित मार्ग काढावा. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १२ तारखेला होणाऱ्या बैठकीत पर्यायी रस्त्याची व्यवस्था न केल्यास दशक्रियेचा मुंडन विधी तहसीलदार कार्यालयातच करू. महेंद्र बोरसे, माजी सरपंच, सात्री

बातम्या आणखी आहेत...