आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचाळीसगाव शहरातून हभप मोतीराम महाराज यांनी ८० वर्षापूर्वी पंढरपूर वारीला प्रारंभ केला. पुढे ही परंपरा त्यांचे चिरंजीव हभप कृष्णा महाराज यांनी सुरू ठेवली आहे. यावर्षी शहरातील शिवाजी चौकातून १६ जून रोजी ‘ग्यानबा-तुकारामा’च्या गजरात वारी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. ही वारी ६ जुलै रोजी पंढरपुरात पोहाेचेल. यंदा वारीचे हे ८१ वे वर्ष असल्याचे कृष्णा महाराज यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. गेल्या १३ वर्षांपासून कृष्णा महाराजांच्या वारीत ८ ते २० वर्षे वयोगटातील बाल व किशोरवयीन २५ वारकरी सहभागी होतात. यंदा वारीत एकूण ६०० वारकरी सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या १५ वर्षांपासून कृष्णा महाराज हे आपल्या घरातच मुलांना अध्यात्माचे शिक्षण देत असून त्यांचे विनामूल्य पालनपोषणही करत आहेत. ही मुले कीर्तनासोबतच शिक्षणाचेही धडे गिरवतात. मुलांमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील काही मुलांचा समावेश आहे. १५ जून रोजी पंढरीकडे प्रस्थान गेल्या दाेन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे लॉकडाउन करण्यात आल्याने पंढरपूरला वारी निघाली नव्हती. त्यामुळे संपूर्ण वारकरी परिवार नाराज झाला होता. मात्र यंदा पंढरपूरला वारी निघणार असल्याने वारकऱ्यांचा उत्साह वाढला आहे. हभप ज्ञानेश्वर माऊली व हभप कृष्णा महाराज यांच्या दोन्ही दिंड्यांचे यंदा १५ व १६ जून रोजी पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. नियोजन अंतिम टप्प्यात गत दोन वर्षात कोरोना महामारीमुळे पहिल्यांदा खंड पडला होता. मात्र यंदा निर्बंध हटवल्याने या दोन्ही दिंड्या यावर्षी मजल दरमजल करत अलंकापुरीत पोहाेचणार आहे. वारीचे नियोजन अंतिम टप्प्यात आल्याची माहिती ज्ञानेश्वर माऊली यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. बेलदारवाडीत ज्ञानेश्वर माऊली यांनी सिद्धेश्वर आश्रमाची मुहूर्तमेढ रोवून पंचक्रोशीत भागवत धर्माचा प्रसार केला आहे. २८ वर्षांपूर्वी पहिल्यांदा आश्रमातून पंढरपूरच्या वारीला सुरुवात झाली. यंदा वारीचे हे २९ वे वर्ष आहे. १५ जून रोजी सकाळी ६ वाजता ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीला सिद्धेश्वर आश्रमातून टाळ-मृदंगांच्या गजरात सुरुवात होईल. एकूण ६०० वारकरी दिंडीत सहभागी होतील. ही वारी न्यायडोंगरी मार्गे पुढे लोणी, शिऊर, प्रवरानगर, करमाळा येथून बरोबर ४ जुलै रोजी पंढरीत दाखल होईल. पायी वारीच्या २० दिवसांत ‘लेक जगवा, लेक शिकवा’, वृक्ष संवर्धन, स्त्री भ्रूणहत्या यासह व्यसनमुक्ती, पाणी बचत, स्वच्छता आदी विषयांवर प्रबोधन केले जाते. दरदिवशी होणाऱ्या संकीर्तनासोबतच वारी मार्गावर प्रबोधनाचा गजर केला जातो. वारीची एक आचारसंहिता असून ती पाळणे बंधनकारक असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.