आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची भीती:जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचे सावट, रब्बी हंगामास धोका; ढगाळ वातावरणाने शेतकरी धास्तावले

चाळीसगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता; पिके काढणीची शेतकऱ्यांची लगबग

खरीप हंगामात अतिवृष्टीने दाणादाण उडवल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बी हंगामात चांगल्या उत्पन्नाची आशा असतानाच पुन्हा अवकाळी पावसाचे संकट घोंगाऊ लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. दोन आठवड्यांपूर्वीही तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली होती. तर गेल्या तिन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण असल्याने ऐन पिके काढणीच्या काळात रब्बीवर पुन्हा एकदा अवकाळीचे सावट निर्माण झाले आहे. यातच पावसाच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत.

चाळीसगाव तालुक्यात यंदा ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगामाची संपूर्ण नासाडी केली होती. त्यामुळे बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. हे सर्व नुकसान विसरून शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली. रब्बी हंगामाचे पीक चांगले आले असून आता रब्बी हंगामातील पिक काढणीच्या तयारीला शेतकरी लागले आहेत. असे असताना रब्बी पिकांवरही अवकाळीचे ढग जमा झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तर रब्बीलाही फटका
अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास मार्च महिन्यात कापणीला आलेला गहू, मका व कांद्याच्या बियाण्याचे मोठे नुकसान होते. वादळामुळे मका व केळीसह फळबागांनाही फटका बसतो. तालुक्यात यंदा रब्बीचा रेकॉर्डब्रेक पेरा झाला आहे. त्यात सर्वाधिक पेरा मका पिकाचा आहे. तालुक्यात एकूण २१ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. आता पुन्हा अवकाळीचे ढग घोंगाऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये रब्बीचे नुकसान होण्याची भीती आहे.

दाेन आठवड्यापूर्वीही पावसाचा तडाखा
दाेन आठवड्यापूर्वीही अवकाळी पावसाने तालुक्यात हजेरी लावली होती. तेव्हा ४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. पावसाचा जाेर कमी असल्याने पिके वाचली. आता पुन्हा गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता आहे. नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांची पिक काढणीची लगबग सुरू असून काढलेली पिके झाकून ठेवण्यासह अन्य कामांची धावपळ सुरू आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी चौकात गुरुवारी ढगाळ वातावरण असल्याने दुपारीच अशा पद्धतीचे वातावरण तयार झाले होते.

ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट
गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होवून तापमान ४२ अंशावर गेले होते. कडक ऊन पडू लागले असताना गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातवरण पसरल्याने तापमान पुन्हा चाळिशीपर्यंत खाली आले आहे. ढगाळ वातावरण व विदर्भातील उष्णतेची लाट ओसरल्यामुळे तापमानात घट झाली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहणार असून, बंगालचा उपसागर आणि किनारपट्टीवर चक्रावात निर्माण झाल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन राज्यात पावसाची स्थिती निर्माण झाल्याची नोंद हवामान विभागाकडे आहे.

बातम्या आणखी आहेत...