आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्थिक वर्ष संपण्यासाठी माेजके दिवस शिल्लक राहिल्याने कर वसुलीसाठी चाळीसगाव नगरपालिकेने अॅक्शन मोडवर येत धडक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दाेन दिवसांत पालिकेच्या पथकाने कर थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला असून ६७ थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करत ४ गाळेही सील केले. पालिकेची मार्च अखेर अवघी ३२ टक्के कर वसुली झाली असून कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी येत्या काळात कर वसुलीसाठी धडक माेहीम राबवली जाणार आहे.
नागरिकांनी आपल्याकडील कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत ठाेंबरे यांनी केले आहे. शहरात जवळपास २२ हजार ४०० मालमत्ताधारक असून एकूण १७ हजार ५०० नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. पालिकेची गेल्यावर्षी जवळपास ६७ टक्केच करवसुली झाली होती.
तर यंदा ८५ टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट पालिका प्रशासनानेठेवले आहे. घर-पाणी पट्टी मिळून ४.७० काेटींची वसुली यंदा नगरपालिकेला घरपट्टीसाठी ९.५० कोटींचे उद्दिष्ट असून मंगळवारपर्यंत त्यातील ३ काेटी वसूल झाले आाहेत. तर पाणीपट्टी वसुलीचे ४ कोटी ५० लाखांच्या उद्दिष्टापैकी १ काेटी ७० लाख रुपये वसूल झाले आहेत.
एकूण ४ काेटी ७० लाख रुपये वसूल करण्यात आले. आतापर्यंत एकूण ३२ टक्के कर वसुली झाल्याची माहिती कर निरीक्षक राहुल साळुंखे यांनी दिली. पथकातील दिनेश जाधव, कृणाल कोष्टी, कुणाल महाले, जितेंद्र जाधव, प्रेमसिंग राजपूत, अशोक देशमुख, सुमित सोनावणे, प्रशांत सोनावणे, किशोर देशमुख यांच्यासह कर्मचारी धडक कारवाई करत आहेत. दरम्यान नागरिकांनी थकीत कराचा भरून कटू कारवाई टाळण्याचे आवाहन केले.
थकबाकीदारांवर कारवाईसाठी चाळीसगाव येथे तीन पथके नियुक्त
यंदा जास्तीत जास्त कर वसुलीसाठी पालिकेने कंबर कसली आहे. नगरपालिकेच्या वतीने शहरातील थकीत मालमत्ताधारकांना वारंवार तोंडी लेखी सूचना देऊनही बऱ्याच मालमत्ताधारकांनी थकीत रकमेचा भरणा केला नाही. परिणामी थकबाकीचा बोजा दिवसागणिक वाढत चालला आहे. जे नळ कनेक्शन धारक पालिकेच्या वतीने वारंवार नोटीस देऊन सुद्धा कर भरण्यास तयार नाहीत त्यांचे नळ कनेक्शन बंद तसेच गाळे सील करण्याचा सपाटा पालिकेने लावला आहे. यासाठी मुख्याधिकारी प्रशांत ठाेंबरे व कर निरीक्षक राहुल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके नियुक्त केली आहेत.
थकीत कराच भरणा करून सहकार्य करावे
शहरातील विकास कामे सुरळीत सुरू राहण्याच्या दृष्टीने नगर परिषदेची कर वसुली आवश्यक आहे. त्यामुळे थकीत कराचा लवकरात लवकर भरणा करून नगर परिषदेला सहकार्य करावे. -प्रशांत ठोंबरे, मुख्याधिकारी
मालमत्तेवर बाेजा बसवून जप्तीचा इशारा
पहिल्या टप्प्यात पालिकेने, गेल्या दाेन वर्षांपासून थकबाकीदार असलेल्या ३०० मालमत्ताधारकांना नाेटिसा बजावल्या हाेत्या. तर ४० जणांचा पाणीपुरवठा देखील खंडित करण्यासह थकबाकीदारांच्या मालमत्तेवर बोजा बसवून जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पालिकेने दिला आहे. त्यानुसार आतापर्यंत ६७ थकबाकीदार मालमत्ताधारकांचा पाणीपुरवठा खंडीत केला आहे. तर गेल्या दाेन दिवसांत न.पा. पथकाने चार गाळे सील केल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत ठाेंबरेंनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.