आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरुस्ती गरजेची:चाळीसगावातील अत्यंत वर्दळीच्या तितूर नदीवरील पुलाचे कठडे कधी बसवणार?

चाळीसगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ ला जोडणाऱ्या शहरातील हॉटेल दयानंद जवळ औरंगाबाद रस्त्यावरील तितूर नदीवरील पुलाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पुलाचे कठडे तुटल्याने तो धोकादायक बनला आहे. दुरुस्तीसोबत पुलाची उंची वाढवण्याचीही मागणी नागरिकांनी केली आहे. यावर प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली नाही तर भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे. शहरातील तितूर नदीवरील पुलाला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. दोन्ही बाजूचे लोखंडी व सिमेंटचे कठडे तुटले असून दुतर्फा असलेल्या साईडपट्ट्याही खराब झाल्या आहेत. सिमेंट काँक्रीटचे कठडे तुटून लोखंडी सळ्या वर आल्या आहेत. पुलावर खड्डयांचे प्रमाणही वाढले असून अपघाताची शक्यता व्यक्त होत आहेत. शहरातून येताना पुलाच्या सुरुवातीस मोठे धोकादायक वळण आहे. मात्र तेथे फक्त वळणाची खूण आहे. वास्तविक तेथे ‘धोकेदायक वळण, सावकाश जा’ असा फलक लावणे अत्यंत गरजेचा ठरला आहे. पुलाकडे दुर्लक्ष; नागरिक नाराज बाजार समितीही पुलापलीकडे असून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेस तसेच उसाचे ट्रक, वाळूने भरलेले अवजड वाहने शहरातून या पुलावरून ये-जा करतात. तर पावसाळा ऐन तोंडावर येऊन ठेपला असून अद्याप या पुलाकडे कुणीही लक्ष देत नसल्याने शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या भागात उसाचे तसेच फळ बागांचे क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे येथून रोज मोठ्या प्रमाणात फळांसह शेतीमाल इतर ठिकाणी नेण्यासाठी वाहतूक होते. त्यामुळे पुलाची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास पुलाच्या तिकडील म्हणजेच नागद रस्त्यावरील रहिवासी, हुडको-सिडको, राम नगर, गोट्या मारुती, प्रभात गल्ली, घाट रोड, जयभीम नगर, चौधरी वाडा या भागातील रहिवासी असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंदीबाई बंकट मुलांची-मुलींची शाळा, व्ही.एच पटेल प्राथमिक विद्यालय, छोटी अभिनव या शाळेत यावे लागते म्हणजेच हा पूल पार करून इकडे यावे लागते. पावसाळ्यात पुलावरून पाणी गेल्यास तुटलेले कठडे दिसत नाही. परिणामी मोठा धोका संभवतो. अशा स्थितीत पावसाळा व शाळा उघडण्याची वेळ तोंडावर येऊन ठेपली आहे.

रोज हजारो वाहनांची दिवस-रात्र वर्दळ गावालगतच्या तितूर नदीच्याया पुलावरून दिवस-रात्र वर्दळ सुरू असते. औरंगाबादकडून, सोलापूर, बीडकडे जाण्याचा हा एकमेव मार्ग असल्याने एका दिवसात अवजड वाहनांसह सुमारे हजार ते बाराशे वाहने ये-जा करतात. त्यामुळे पुलाची दुरुस्ती गरजेची असून सध्या ताे अत्यंंत धोकादायक झाला आहे.

खासदार उन्मेष पाटील यांनी दिले होते आश्वासन गेल्यावर्षी महापुरांमुळे पुलाची अवस्था बिकट झाल्याने खासदार उन्मेष पाटील यांनी पुलाची पाहणी करून त्याची दुरुस्ती व उंची वाढवण्यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रीय महामार्ग विभागात या पुलाच्या समावेशाचा प्रस्ताव दाखल केेला. मात्र अद्याप त्यांनीही दुरुस्ती केली नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...