आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेवळ गुण मिळवण्यासाठी शिक्षण घेऊ नका, नकला करणारे मुळीच होऊ नका, आपण कोण आहोत, हे ओळखा. आपली बलस्थाने कोणती आहेत, ते समजून घ्या. जे कमी आहे, ते आयुष्यातून वजा करा आणि आपली बलस्थाने जी असतील, त्यावर लक्ष केंद्रित करा. तसेच आजकाल युवकांमध्ये दिवसेंदिवस मोबाइलचे व्यसन वाढत आहे. शरीर स्वास्थ्यासाठी विद्यार्थ्यांनी आधी मैदानावर शरीर कमवावे आणि वर्ग खोल्यांमध्ये जाऊन ज्ञान ग्रहण करावे, असा सल्ला अब्दुल भाई यांनी विद्यार्थ्यांना दिला. जळगाव येथील गांधी रिसर्च सेंटरची ग्राम-संवाद सायकल यात्रा ३० जानेवारीपासून जळगाव जिल्ह्याच्या भ्रमंतीवर निघालेली आहे. या सायकल यात्रेचा तिसऱ्या दिवसाचा मुक्काम पाराेळा येथील किसान महाविद्यालयात होता.
या वेळी ग्राम संवाद यात्रेतील ७८ वर्षीय अब्दुल भाई यांनी किसान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गिरीष कुलकर्णी यांच्या नेतृत्वात ही सायकल यात्रा पारोळा शहरांमध्ये भ्रमण करत आहे. या वेळी त्यांनी एनइएस हायस्कूलमधील विद्यार्थ्यांशी ही संवाद साधला. तसेच आझाद चौकात सायंकाळी त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. किसान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील आणि उपप्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे यांनी या ग्राम-संवाद यात्रेचे स्वागत केले. रासेयोचे कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रदीप औजेकर, डॉ. अनिता मुडावदकर, प्रा. के. एस. गायकवाड, प्रा. शिरीष सूर्यवंशी, कर्मचारी अरुण पाटील, अक्षय निकम यांनी या सायकल यात्रेतील सहभागी असलेल्या सदस्यांचे स्वागत केले. किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांनी यात्रेस शुभेच्छा दिल्या.
१३ दिवसात ३५० किलाेमीटरचा करणार प्रवास ग्राम संवाद यात्रेत अर्जेंटीनाहून आलेल्या मारिया, ९ वर्षाचा नीर झाला व ७८ वर्षीय अब्दुल भाई यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ग्राम संवाद सायकल यात्रेचे आयोजन केले आहे. जळगाव येथून ३० यात्री ३० जानेवारीपासून सायकलद्वारे भ्रमंतीला निघाले अाहेत. ही या यात्रा १३ दिवसात ३५० किलोमीटरचा प्रवास करून २६ गावांना भेटी देणार आहेत.
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत गांधीजींचे मोठे योगदान असून गांधींच्या विचारांनी या देशाला स्वातंत्र्य मिळाले. बाहेरून आलेले लोक आपल्या देशात गांधीजींचा विचारांचा प्रचार-प्रसार करतात. त्यांना गांधी समजले, परंतु आपल्याला समजायला आजही वेळ लागत असल्याची खंत माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी गांधी ग्राम संवाद सायकल यात्रेनिमित्त तामसवाडी येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच हिरामण पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सतीश पाटील, प्राचार्य ए. के. चव्हाण, ज्येष्ठ गांधी विचारवंत अब्दुल भाई, नीर झाला, अमेरिकेतील मारिया, यात्रेचे समन्वयक गिरीश कुलकर्णी, डॉ. अश्विनी झाला, संदीप पवार, अजय पाटील व विद्यार्थी हजर होते. हिरामण पवार यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी गांधींच्या विचारांचा स्वीकार करावा, असे अावाहन केले. सूत्रसंचालन सी. डी. पाटील तर संदीप पवार यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.