आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन:तुमचा जन्मही नव्हता, तेव्हापासून आम्ही शिवसेनेत ; गुलाबराव पाटील

न्हावी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमच्यावर ५० खोके एकदम ओके, अशी टीका करत आहात. मात्र, ३५ वर्षांपासून शिवसेनेमध्ये आहे. अनेक आंदोलने केली. जेलमध्ये गेलो. आता ३२ वर्षांचा पोरगा असलेले आदित्य ठाकरे आम्हाला गद्दार म्हणतो. मात्र, त्यांचा जन्मही झालेला नव्हता तेव्हापासून हातात शिवसेनेचा झेंडा आहे. तुम्ही स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचे वारसदार होऊ शकता, विचारांचे नाही, असा टोला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला.

न्हावी (ता.यावल) येथे ग्रामपंचायतीद्वारा आयोजित जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण कार्यक्रमात ते रविवारी बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले की, १३ ऑगस्ट २०२१ रोजी न्हावी गावातील कार्यक्रमात पाणीपुरवठा योजनेची मागणी झाली. पाणीपुरवठा मंत्री झाल्यावर २ कोटी ७८ लाखांची मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर केली. अध्यक्षस्थानी खासदार रक्षा खडसे, तर आमदार सुरेश भोळे, आमदार शिरीष चौधरी, शरद महाजन, प्रभाकर सोनवणे. हिरालाल चौधरी नरेंद्र नारखेडे आदी उपस्थित होते. सरपंच भारती चौधरी, उपसरपंच उमेश बेडाळे, ग्रामविकास अधिकारी प्रताप बोदडे, नितीन चौधरी यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविकात सरपंच भारती चौधरी यांनी गावात तीन रेशन दुकाने असल्याने गैरसोय होते. त्यामुळे नवीन रेशन दुकान मिळण्यासाठी ग्रामपंचायतीत ठराव करून पालकमंत्र्यांना निवेदन दिले. हे दुकान दिव्यांग सेना बचत गटाला मिळावे, ही विनंती केली.

पाझर तलाव दुरुस्तीचे साकडे
शेतीसाठी विजेची वेळ बदलून मिळावी. भिलाण शिवारातील सन २००६मध्ये वाहून गेलेल्या पाझर तलावाची दुरुस्ती करावी या मागणीसाठी मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले. तसेच ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी हरिभाऊ गाजरे, दिवाकर पाटील, गिरीश पाटील, प्रकाश वारके या कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...