आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईचा बडगा:प्रमुख 5 नाल्यांवर 1 हजार 572 अतिक्रमण; आता नाेटीस बजावणार

धुळे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे नाल्यांना पूर आल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यानंतर नाल्यांवरील अतिक्रमण व सफाईचा मुद्दा ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर आयुक्त देविदास टेकाळे यांनी बुधवारी घेतलेल्या बैठकीत दाेन दिवसांत प्रमुख नाल्यांवरील अतिक्रमणाची माहिती सादर करण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार ५ नाल्यावर एकूण १ हजार ५७२ जणांनी अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे. संबंधितांना महापालिकेकडून नाेटिसा दिल्या जाणार आहे.

शहरातील प्रमुख नाल्याच्या काठावर काहींनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मनप प्रशासनाने नाल्यांवरील अतिक्रमणाची माहिती संकलित केली. त्यानुसार साक्री राेडवरील माेती नाला, मुस्लिम नगरातील नाला, सातव्या गल्लीच्या मागून जाणारा हागऱ्या नाला, देवपुरातील सुशी नाला, नेहरू चाैकातील लाेंढी नाल्यावरील अतिक्रमणाची पाहणी झाली. पाचही नाल्यावर १ हजार ५७२ अतिक्रमण असल्याची बाब पुढे आली आहे.

जिल्हाधिकारी घेणार आढावा
शहरातील अतिक्रमणाकडे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनीही लक्ष घातले आहे. त्यांनी महापालिकेला अतिक्रमण काढण्याची सूचना केली आहे. पण अद्याप कारवाई झाली नाही. तसेच आपत्ती व्यवस्थापन व अतिक्रमण विरोधातील कारवाईचा आता जिल्हाधिकारी बैठक घेऊन आढावा घेतील. आगामी काळात अतिक्रमण निघण्याची शक्यता आहे.

दुरुस्तीसह संरक्षण भिंतीचा प्रस्ताव
नाल्यावरील अतिक्रमण काढल्यानंतर नाल्याची सफाई करणे,त्यांना संरक्षण भिंत बांधण्याचा प्रस्ताव करण्यात येईल.हा प्रस्ताव शासनाकडे पाठवून निधीची मागणी होईल.त्यासाठी किती खर्च लागेल, कुठे संरक्षण भिंत बांधायची याचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून तयार करण्याची सूचना केली.

सिंचन विभागाशी पत्रव्यवहार
शहरातून वाहणारे नाले सिंचन विभागाच्या अखत्यारित येतात. त्यामुळे या नाल्यांची लांबी, रुंदीसह इतरही माहिती या विभागाला देण्यात आली आहे. तसेच नाल्यावरील अतिक्रमण काढण्याची विनंती मनपाने केली आहे. लाेकप्रतिनिधींनीही अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...