आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात मोकाट श्वानांची संख्या वाढली आहे. हे श्वान नागरिकांच्या अंगावर धावतात. अनेकवेळा चावा घेतात. महापालिकेच्या दवाखान्यात रोज तीन ते चार जण श्वान दंशानंतर अॅण्टी रेबीज लस घेण्यासाठी येतात. या पार्श्वभूमीवर महापालिकेने श्वानांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ठेकेदार नेमला असून जानेवारी महिन्यापासून प्रत्यक्ष काम सुरू होईल. वर्षभरात १० हजार श्वानांवर शस्त्रक्रिया होतील. ठेकेदाराला एका शस्त्रक्रियेसाठी ८७५ रूपये देण्यात येतील. ठेकेदारासोबत करार झाल्याची माहिती देण्यात आली. शहरातील सर्वच भागात माेकाट श्वानांची संख्या वाढली आहे. श्वान मुख्य चौक, दुभाजकांसह गल्लीबोळात ठाण मांडून बसतात. काही श्वान पिसाळले असून ते नागरिकांना दंश करतात. शहरातील दाट वसाहतींच्या परिसरात श्वानांचा त्रास जास्त वाढला आहे. रात्री-अपरात्री घरी जाणाऱ्यांच्या अंगावर श्वान धावतात. त्यातून अपघात होतात. लहान मुलांच्या मागे लागतात. त्यामुळे मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अनेक वर्षापासून होते आहे.
याविषयावर नगरसेवकांनी महापालिकेच्या महासभेसह स्थायी समितीच्या सभेत लक्ष वेधले होते. त्यानंतर महापालिकेने काही महिन्यापूर्वी श्वानांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी निविदा प्रसिद्ध करून ठेकेदार नेमण्यात आला आहे. ठेकेदाराचे कर्मचारी शहरातील माेकाट श्वानांना पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करतील. शस्त्रक्रिया झाल्यावर काही दिवस श्वानाला देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया करण्याचा ठेका तीन वर्षासाठी आहे. ठेकेदारातर्फे जानेवारी महिन्यापासून काम सुरू होईल.
३ वर्षात ३० हजार शस्त्रक्रिया करणार
महापालिका क्षेत्रातील श्वानांची संख्या नियंत्रित व्हावी यासाठी श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ठेकेदाराची तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. एका वर्षात ठेकेदाराने १० हजार श्वानांवर शस्त्रक्रिया करणे अपेक्षित आहे. त्यानुसार तीन वर्षात ३० हजार श्वानांवर शस्त्रक्रिया होतील. त्यानंतर माेकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येईल, असा महापालिकेचा दावा आहे.
वरखेडी रस्त्यावर असेल व्यवस्था
ठेकेदाराला शस्त्रक्रिया गृह उभारण्यासाठी महापालिकेने वरखेडी रस्त्यावर जागा दिली आहे. या ठिकाणी ठेकेदारातर्फे सर्व सेटअप उभारण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया झाल्यावर काही दिवस श्वानांना याच ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या अन्न, पाण्याची व्यवस्थाही केली जाईल. ठेकेदाराकडे श्वान पकडण्यासाठी स्वतंत्र डॉग व्हॅन असेल. एका शस्त्रक्रियेसाठी ठेकेदाराला ८७५ रूपये दिले जातील.
ज्या भागातून पकडणार त्याच भागात सोडणार
शस्त्रक्रिया करण्यासाठी श्वान पकडताना छायाचित्रण केले जाणार आहे. ज्या श्वानावर शस्त्रक्रिया केली जाईल त्या श्वानाला विशिष्ट टॅग लावण्यात येणार आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया झालेल्या श्वानांची ओेळख पटेल. तसेच ज्या भागातून कुत्रे पकडण्यात येतील. त्याच भागात त्यांना पुन्हा सोडण्यात येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.