आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक घडी:कर वसुलीचे आव्हान 100 कोटींचे; थकबाकीने मालमत्तेवर येणार टाच

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेला मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीतून सर्वाधिक उत्पन्न प्राप्त हाेते. यंदा शहरासह हद्दवाढीतील गावातून चालू मागणी व थकबाकीसह १०० कोटी कर वसूल करण्याचे आव्हान मनपाच्या वसुली विभागासमोर आहे. या पार्श्वभूमीवर थकबाकीदारांवर कारवाई सुरू झाली आहे. नोटीस दिल्यावरही कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. तसेच जे दुकानदार कर भरणार नाही त्यांची दुकाने सील करण्याची कारवाई सुरू झाली आहे. काहींचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आले आहे.

शहरासह हद्दवाढीच्या क्षेत्रातील गावात राहणाऱ्या अनेक मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर थकवला आहे. त्यासाठी सर्वांना नोटीस बजावण्यात आली आहे. मार्च अखेर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे यासाठी महापालिकेच्या वसुली विभागातर्फे आत्तापासून प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. मार्च अखेरीस नागरिक मालमत्ता कर जमा करण्यासाठी महापालिकेत गर्दी करतात. कारण मार्च महिन्यात महापालिकेतर्फे थकबाकीवरील शास्ती माफ केली जाते. जोपर्यंत शास्ती माफीचा निर्णय होत नाही तोपर्यंत अनेक जण कर भरत नाही. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढते. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वारंवार नोटीस बजावल्यावरही कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांची मालमत्ता सील केली जाणार असून, दुकान व घर जप्त करण्यात येणार आहे.

शहरातून ८८ कोटी २२ लाखांची मागणी
धुळे शहरातून चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कराची २५ कोटी ७० लाखांची मागणी असून, ६२ कोटी ५१ लाख रुपये कर थकला आहे. त्यात ३० कोटी ५७ लाख रुपये शास्तीचे आहे. चालू मागणी व थकबाकीसह शहरातून ८८ कोटी २२ लाख रुपये कर वसुलीची मागणी आहे. त्यात हद्दवाढीच्या क्षेत्रातील १५ कोटींचा कर मिळवल्यास महापालिका प्रशासनासमोर १०० कोटी रुपये कर वसूल करण्याचे मोठे आव्हान आहे.

मालमत्तांचे जीआयएस मॅपिंग
मनपा हद्दीत ११ गावांचा समावेश झाला आहे. या भागातील सर्व मालमत्तांची मोजणी जीआयएस मॅपिंगद्वारे करण्यात आली आहे. त्यानंतर मालमत्ता करांचे अंतिम बिल मालमत्ताधारकांना देण्यात आले आहे. महापालिकेच्या हद्दीतील गावांतून १५ कोटी २३ लाख रुपये मालमत्ता कराची मागणी आहे. मनपा हद्दीतील गावात अद्यापही पुरेशा सुविधा मिळत नसल्याने ही रक्कम वसूल करण्याचे मोठे आव्हान महापालिकसमोर आहे. हद्दवाढीच्या भागातून किती कर वसूल होतो हे मार्चअखेर समजेल.

दरमहा लागते २ टक्के शास्ती
महापालिकेतर्फे मालमत्ताधारकांना वेळेवर कर भरल्यास सवलत दिली जाते. त्यानुसार सन २०२२-२३ मध्ये मालमत्ता कराचा पूर्ण भरणा एप्रिल अखेरपर्यंत केल्यास १० टक्के, जूनअखेर भरणा केल्यास ८ टक्के व जुलैअखेर भरणा केल्यास ६ टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यानंतर कर भरल्यास दर महिन्याला २ टक्के शास्ती आकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...