आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टी:20 वर्षांनंतर चार तासांत 128 मिमी पाऊस; वलवाडीत रस्ते पाण्याखाली, वसाहतींना वेढा

धुळे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला गुरूवारी रात्री अकरा वाजेनंतर पावसाने झोडपले. फक्त ४ तासात १२८ मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे देवपूरातील वलवाडी परिसरातील बहुतांश वसाहतीतील रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे नागरिकांना शुक्रवारी सकाळी घरातून बाहेर पडण्यासाठी कसरत करावी लागली. शहरात २० वर्षानंतर असा ढगफुटी सदृष्य पाऊस झाला.

शहरात गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पावसाला सूरूवात झाली. रात्री साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास पावसाने जोर धरला. त्यानंतर सलग दोन ते अडीच तास पावसाने शहराला झोडपले. वलवाडी शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे भरत नगर, तुळशीराम नगर, पाटील नगर, इंद्रप्रस्थ कॉलनी, रामकृष्ण नगर, गोवर्धन नगर, तिरुपती नगर, माध्यमिक शिक्षक कॉलनी, विनोद नगर, पाटील नगर, आधार नगर, शिवराय कॉलनी, अभियंता नगर, एसआरपीएफ कॉलनी, अमोल नगर, नेताजी कॉलनी, योगेश्वर कॉलनी, श्रीकृष्ण नगर, अनमोल नगरात पाणी साचले होते. भरत नगरपासून अमोल नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी होते. रामकृष्ण नगर, इंद्रप्रस्थ कॉलनी, योगेश्वर कॉलनी, एसआरपीएफ कॉलनीतील अनेक घरांना पाण्याचा वेढा होता.

नाल्यांना पूर, भरतनगर जलमय
सुशी नाल्याला पूर आला होता. देवपूरातील दैठणकर नगरात सुशी नाल्याच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांच्या घराच्या पायऱ्यापर्यंत नाल्याचे पाणी आले होते. सिस्टेल स्कूल, बिजली नगर परिसरातील नागरिकांची नाल्याला पूर आल्याने गैरसोय झाली. वलवाडी आणि देवपूर परिसरातील गटारी निमुळत्या असल्याने पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे रस्त्यावर पाणी थांबून होते.

शाळेला सुटी; शुक्रवारी रात्री पुन्हा जोर
देवपूरातील जयहिंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या परिसरात पाणी साचले होते. त्यामुळे शाळेला सुट्टी देण्यात आली. शहरातील अनेक शाळांच्या आवारात पाणी साचले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पुन्हा एक तास पाऊस झाला.

यापूर्वी १९९२ मध्ये १३४ मिमी
शहरात वीस वर्षानंतर असा पाऊस झाला. यापूर्वी २० जून १९९२ मध्ये एकाच दिवसात १३४ मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर ३ जुलै २०१८ मध्ये १०५ मिलीमीटर पाऊस झाला होता. आता ५ ऑगस्टला १२८ मिमी पाऊस झाला.

बातम्या आणखी आहेत...