आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शहरासह हद्दवाढ क्षेत्रामध्ये 16 आरोग्यवर्धिनी केंद्र आता होणार;  पंधराव्या वित्त आयोगातून सुविधा, नागरिकांची होणार सोय

नीलेश बत्तासे | धुळे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, गावातच आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशाने महापालिकेतर्फे शहरासह हद्दवाढीतील गावात नव्याने १६ आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सप्टेंबरअखेर काही केंद्र सुरू करण्याचे नियोजन झाले आहे. त्यासाठी आवश्यक ती तयारी सुरू झाली आहे.

आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान राबवण्यात येते. या अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात नव्याने रुग्णालय उभारण्यात आली आहे. या रुग्णालयात स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली. तसेच महापालिकेचे शहरातील विविध भागात १२ दवाखाने व तीन प्रसूतिगृह आहे. दुसरीकडे काही वर्षांपूर्वी मनपा हद्दीत दहा गावांचा समावेश झाला. या गावातील नागरिकांना गावातच आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहे. त्यानुसार पंधरा वित्त आयोगांतर्गत महापालिकेला १६ आरोग्यवर्धिनी केंद्र मंजूर झाले आहेत.

या केंद्रातून नागरिकांना बाह्यरुग्ण सेवा मिळेल. तसेच औषधही दिली जातील. प्रत्येक आरोग्यवर्धिनी केंद्रात डाॅक्टर, नर्स व अन्य कर्मचारी असतील. आरोग्यवर्धिनी केंद्र पाच वर्षांसाठी सुरू करण्यात येणार आहे. औषध देण्यासह कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया जिल्हा परिषदेतर्फे होईल. काही केंद्र महापालिकेच्या जागेत व काही ठिकाणी भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू करण्यात येणार आहे.

कुठे असतील प्रमुख केंद्र
महापालिका मालकीच्या जागेतील शाळा, समाज मंदिरात आरोग्यवर्धिनी केंद्राला जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यात शहरातील लाला सरदार नगर, नकाणेरोड, समतानगर, वलवाडी, शाळा नंबर ५ व १६ याठिकाणी आत्तापर्यंत आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी जागा देण्यात आली असून, या ठिकाणी केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

भाडेतत्त्वावरील इमारतीत काही केंद्र करणार कार्यरत
काही आरोग्यवर्धिनी केंद्र भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू करण्यात येणार आहेत. त्यात मोहाडी उपनगर, बिलाडीरोड, चक्करबर्डी परिसर, अक्षय कॉलनी या भागांचा समावेश आहे. तसेच साई एकता नगर, कृषी कॉलनीतही भाडेकराराने जागा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सप्टेंबरअखेर केंद्र कार्यरत : महापालिकेच्या जागेत ६ ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र होणार आहे. शासकीय जागेतील केंद्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटी सुुरू होतील, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...