आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील प्रत्येक बँक शाखेच्या व्यवस्थापकांनी खरीप पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले. दरम्यान, आज अखेर १६० कोटी ४ लाख रुपयांचे पीक कर्जांचे वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्याला खरीप हंगामासाठी ६०३ कोटी ४१ लाखांचे पीक कर्जाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला स्टेट बँक इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक सूरजितकुमार सहा, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जयंत देशपांडे, ‘नाबार्ड’ चे जिल्हा व्यवस्थापकीय संचालक प्रमोद पाटील, जिल्हा सहकार उपनिबंधक भारती ठाकूर आदी उपस्थित होते. पीक कर्ज वितरणासाठी बँकांनी मेळावे घ्यावेत : जिल्हाधिकारी बैठकीत जिल्हाधिकारी खत्री म्हणाल्या की, खरीप हंगाम २०२२ साठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देऊन १०० टक्के खरीप कर्ज वाटप होईल याकडे बँकेने विशेष प्रयत्न करावे. यासाठी बँकेने अधिकाधिक पीक कर्जाचे मेळावे घ्यावेत. अधिकाधिक वनपट्टेधारकांना पीक कर्जाचे वाटप करावेत. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणिकरण राहिलेल्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरणाचे काम त्वरित पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले. वीज, इंटरनेटची समस्या सोडवू जिल्ह्यातील दुर्गम भागातील धडगाव, अक्कलकुवा आणि मोलगी या भागात बँक सेवा देण्यासाठी प्रयत्न करावेत. या भागात सेवा देताना बँकांना येणाऱ्या वीज व इंटरनेट यांच्या जाणवणाऱ्या समस्या सोडवल्या जातील. बँकांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, पीएम किसान योजना, मुद्रा योजनेचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा. बँकेच्या दर्शनी भागावर कर्ज प्रक्रियांची माहिती प्रदर्शित करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी या बैठकीत बोलताना दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.