आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक जैसे थे:धुळे, नंदुरबारमधून 171 बस; मुंबई, पुणे फेऱ्या रद्द; शालेय वाहतूक जैसे थे

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना आणि शिंदे गटाचा मुंबईत उद्या बुधवारी दसरा मेळावा होतो आहे. या मेळाव्यासाठी धुळे विभागातून तब्बल १७१ बसची नोंदणी झाली आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यातून ११० तर धुळे जिल्ह्यातून ६१ बसेसचा समावेश आहे. दसरा मेळाव्यासाठी बस जात असल्या तरी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शालेय फेऱ्यांच्या वेळापत्रकात बदल केलेला नाही. दुसरीकडे मुंबई, बोरीवली आणि पुण्याकडे जाणाऱ्या बससह लांब पल्ल्याच्या काही फेऱ्या रद्द केल्या.

मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून शिवसेना व शिंदे गटातर्फे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना नेण्याचे प्रयत्न होत आहे. मेळाव्यासाठी धुळे विभागातून तब्बल १७१ बसची नोंदणी झाली आहे. त्यात धुळे आगारातून २५ बसचा समावेश आहे. त्यात ५ शिवशाही आहे. शिंदखेडा आगारातून ५, शिरपूर आगारातून ७, साक्री आगारातून १०, दोंडाईचा आगारातून १ बसची नोंदणी झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी ११० बसची नोंदणी सायंकाळी ५ वाजेपर्यंत झाली हाेती.

त्यानंतर पुन्हा सायंकाळी १० अतिरिक्त बसची नोंदणी झाली. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, अक्कलकुवा, शहादा, तळोदा, नवापूर या पाच आगारातील बस गावागावातून मेळाव्याला जाणाऱ्या प्रवाशांना बसवतील. शहादा, अक्कलकुवा आगारातून निघणाऱ्या बस दोंडाईचा मार्गे येणार असल्यामुळे दोंडाईचा परिसरातील कार्यकर्त्यांना या बसमध्ये बसवले जाईल. सर्व कार्यकर्त्यांना घेऊन काही बस रात्री तर काही पहाटे मुंबईकडे रवाना होतील. बसची नोंदणी एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल कार्यालयातून झाली आहे. मुंबई कार्यालयातून धुळे विभागात फक्त किती बसची नोंदणी झाली हेच सांगण्यात आले. दोन दिवसांसाठी बसची नोंदणी आहे. धुळे विभागातून जाणाऱ्या बस कुर्ला येथे पार्क होतील, असे सांगण्यात आले.

शिवसेनेचे साडेआठ हजार कार्यकर्ते : सोनवणे
मेळाव्यासाठी दोन्ही गटांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांना मुंबईत आणण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार शिवसेनेतर्फे आठ ते साडेआठ हजार शिवसैनिक मेळाव्याला जाणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अतुल साेनवणे, महानगरप्रमुख धीरज पाटील, डाॅ. सुशील महाजन यांनी दिली. दीड हजार शिवसैनिक मंगळवारी रेल्वेने मुंबईला रवाना झाले. अन्य कार्यकर्ते बुधवारी पहाटे जाणार आहेत. काही जण कासाऱ्यापर्यंत खासगी वाहनाने जातील. तेथून पुढे रेल्वेने मुंबईत जातील, असे सांगण्यात आले. शिवसेनेचे कार्यकर्ते खासगी वाहन व रेल्वेने मुंबईला जाण्यास प्राधान्य देत आहे.

शिंदे गटाचे १० हजार कार्यकर्ते : महाले, गावित
शिंदे गटाचे दहा हजार कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती सतीश महाले, डाॅ. तुळशीराम गावित यांनी दिली. कार्यकर्त्यांना नेण्यासाठी धुळे शहरातून ५० बस, इतर वाहनांची व्यवस्था केली आहे. तसेच साक्री, शिरपूर, शिंदखेडा येथून ५० बस बुधवारी सकाळी जातील. प्रत्येक बसमध्ये चाळीस जण असतील. प्रत्येक बसची जबाबदारी तीन जणांवर असेल. याशिवाय ग्रामीण भागातून खासगी वाहनाने काही जण जातील. कार्यकर्त्यांना नेण्याचे नियाेजन शिंदे गटाचे सतीश महाले, डाॅ. गावित यांनी केले आहे. त्यानुसार वाहनांना स्टीकर लावण्याचे काम मंगळवारी सुरू असल्याचे दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...