आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कायम असल्याचे महिला आणि बालकल्याण विभागाने आरोग्य विभागाच्या मदतीने मे महिन्यात केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. सर्वेक्षणात जिल्ह्यात २ हजार ४८३ तीव्र कमी वजनाचे (सॅम) तर ७ हजार ९८८ बालके कुपोषित (मॅम) आढळली.
कोरोनाची चौथी लाट आणि पावसाळ्यात कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता विचारात घेऊन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने १८ ते ३१ मे दरम्यान ० ते ६ वर्षे वयोगटातील सॅम व मॅम श्रेणीतील बालकांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम राबवली. या मोहिमेत जिल्ह्यातील १ लाख ४४ हजार ४८१ बालकांची तपासणी झाली. त्यात ० ते ६ महिने वयोगटातील ११ हजार ७५५, ७ महिने ते ६ वर्षे वयोगटातील १ लाख ३२ हजार ७२६ बालकांची तपासणी झाली. त्यातून मॅम श्रेणीत म्हणजेच मध्यम कुपोषित ७ हजार ९८८ बालके आढळली. सॅम श्रेणी अर्थात अतितीव्र कमी वजनाचे २ हजार ४८३ बालक आढळली. अतितीव्र कुपोषित बालकांमध्ये मुलांची संख्या १ हजार ३७० तर मुलींची संख्या १ हजार ११३ आहे. पावसाळ्यानंतर कामासाठी झालेले स्थलांतर हे कुपोषण वाढीचे कारण आहे.
साक्री, शिरपूर तालुक्यात प्रमाण जास्त
महिला व बालकल्याण विभागातर्फे शिरपूर व साक्री या आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये कुपोषण निर्मूलनासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येतात. नियमित पोषण आहारासह अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबवली जाते. त्यानंतरही दोन्ही तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यात १० बालविकास प्रकल्प आहे. त्यापैकी शिरपूर एक व दोनमध्ये ६९०, साक्रीत १६८, दहिवेलला ३७१ आणि पिंपळनेरला ३३७ अतितीव्र कुपोषित बालके आढळली. धुळे प्रकल्प एकमध्ये २१६, दोनमध्ये ३६२, तीनमध्ये १९५, शिंदखेडा प्रकल्प एकमध्ये ६९, दोनमध्ये १४४ बालके कुपोषित आढळली.
२१ हजार बालकांचे स्थलांतर
अनेक मजूर कामाच्या शाेधासाठी स्थलांतरित झाले आहे. मजुरांसोबत ० ते ६ वर्ष वयोगटातील २१ हजार बालकांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे स्थलांतरित बालकांचे स्क्रिनिंग झालेले नाही. गुजरात राज्यात २ हजार ६०१ बालकांचे स्थलांतर झाले आहे. १९ हजार ३१८ बालकांचे तात्पुरते स्थलांतर झाले.
असा मिळणार आहार
सॅम बालकांसाठी ग्राम बालविकास केंद्र सुरू होईल. केंद्रात सॅम श्रेणीतील बालकांना इमरजन्सी डेन्स न्यूट्रिशिअस फूड मिळेल. एक आठवड्यात अडीच ते साडेतीन किलो वजनाच्या बालकांना पूरक पोषण आहाराची ७ पाकिटे, साडेतीन ते सात किलो वजनाच्या पालकांना १४ पाकिटे मिळतील.
कुपोषण मुक्तीसाठी उपाययोजना
जिल्ह्यातील तीव्र कमी वजनाचे (मॅम) आणि अतितीव्र कमी वजनाच्या (सॅम) बालकांचे सर्वेक्षण केले. सॅम श्रेणीतील बालकांसाठी अंगणवाडीत ग्राम बालविकास केंद्रे सुरू होणार आहे. कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न होतील. -हेमंत भदाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.