आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नपूर्ती:अडीच वर्षांत 24 स्टार्टअप; नव्याने 15 सुरू होणार, बेरोजगारीवर मात

धुळे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योजक होण्याच्या स्वप्नांना काही वेळा आर्थिक पाठबळ मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तरुण मुंबई, पुण्याची वाट धरतात. ही बाब लक्षात घेऊन तरुणांना जिल्ह्यातच त्यांचा उद्योग सुरू करता यावा यासाठी खान्देश उद्योग प्रबोधिनीने पुढाकार घेतला आहे. तरुणांच्या उद्योग संकल्पनांचे वर्गीकरण करत बिझनेस व प्रोडक्ट मॅनेजमेंट, फंड रायझिंग या तीन टप्प्यावर प्रबोधिनीकडून तरुणांना सहकार्य केले जाते आहे. त्यामुळे अडीच वर्षांत जिल्ह्यात २४ स्टार्टअप सुरू झाले. त्यातून तरुणांचे उद्योजक होण्याचे स्वप्न सत्यात उतरले. तसेच बेरोजगारांना कामही मिळाले.

नवीन उद्योग सुरू करण्यासाठी संकल्पना म्हणजे आयडिया असणे आवश्यक असते. ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी पाठीशी अनुभवी व्यक्ती लागते. तसेच आर्थिक मदत, प्रोडक्ट मॅनेजमेंट, बँडिंग या सर्व पातळीवर काम करावे लागते. ही बाब लक्षात घेऊन हर्षल विभांडिक यांनी सन २०१८ मध्ये स्टार्टअप सुरू करणाऱ्यांना दिशा दर्शवण्याचे काम सुरू केले. त्यांना पुढे प्रकाश पाठक, श्रीराम देशपांडे यांची मदत झाली. त्यातून खान्देश उद्योग प्रबोधिनी उदयास आली. स्टार्टअप सुरू करणाऱ्यांच्या संकल्पना समजून घेणे, त्यांना प्रेझेंटेशनसाठी मार्गदर्शन करणे, अर्थ पुरवठादारांची बैठक घेत आर्थिक पाठबळ मिळवून देण्याचे काम प्रबोधिनीच्या माध्यमातून होते आहे. त्यामुळेच आत्तापर्यंत जिल्ह्यात २५ स्टार्टअप सुरु झाले असून १५ ते २० सुरू होण्याचा मार्गावर आहे.

शहाद्याच्या सूरजमुळे २५ जणांना रोजगार
शहादा येथील सूरज चौधरी याने फूड डिलिव्हरी करणारे स्कायइट अॅप तयार केले. या स्टार्टअपसाठी त्याला १० लाखांची गरज होती. ही मदत उद्योग प्रबोधिनीने मिळवून दिली. त्यासाठी फेब्रुवारीत इन्व्हेस्टमेंट मीट झाले. त्यात तीन गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीची तयारी दर्शवली. त्यामुळे सूरजने स्टार्टअप सुरू झाले. सूरजचे व्यवसायाचे मुख्यालय धुळे आहे. त्याच्या अॅपची सेवा २३ तालुक्यात सुरू आहे. त्यातून २५ जणांना रोजगार मिळाला. १०० तालुक्यांत पोहाेचण्याचा सूरजचा प्रयत्न आहे.

बारावी पास लोकेशला मदतीचा हात
बारावी पास लोकेश सोनवणे व आयटी अभियंता राहुल पाटील यांनी अर्न नाउ हे मार्केटिंग अफिलेटड अॅप स्टार्टअप सुरू केले. त्यासाठी उद्योग प्रबोधिनीने आर्थिक मदत मिळवून दिली. हे अॅप प्राथमिक स्तरावर आहे. या अॅपच्या डिजिटल मार्केटिंगसाठी फंडिंगची गरज आहे. सचिन अंपळकरने आरटीओ २४ बाय ७ नावाचे अॅप सुरू केले. परिवहन विभागाच्या कामात पारदर्शकपणा यावा हा त्यामागील उद्देश आहे. सचिनने स्वत: गुंतवणूक केली. उद्योग प्रबोधिनीने मार्गदर्शन केले.

एकच अट, जिल्ह्यात असावे मुख्यालय
खान्देश उद्योग प्रबोधिनीत हर्षल विभांडिक, ज्येष्ठ विचारवंत प्रा. प्रकाश पाठक, सीए श्रीराम देशपांडे यांचा समावेश आहे. स्टार्टअप सुरू करण्यासाठी फक्त एकच अट असते. ती म्हणजे उद्योगाचे मुख्यालय धुळे जिल्ह्यात असावे.

इलिटेक कंपनी परराज्यात पोहोचली; एक कोटींवर पोहोचली उलाढाल
अभियंता दर्शन यादवने खान्देश उद्योग प्रबोधिनीचे मार्गदर्शन आणि सहकार्याने २०१९ मध्ये सर्वा इलिटेक कंपनी सुरू केली. ही कंपनीत फूड प्रोसेसिंगसाठी लागणारी यंत्रसामग्री ग्राहकांच्या मागणी प्रमाणे पुरवते. कोरोनात सर्व व्यवसाय ठप्प झाल्याने यादव यांना फटका बसला. आता त्यांना कर्नाटक राज्यातील सर्व कृषी महाविद्यालयांसाठी कांदा प्रोसेसर आणि स्टोरेज मॉडेल बनवले आहे. त्यांची वार्षिक उलाढाल एक कोटीवर गेली आहे. त्यांना उद्योग सुरू करण्यासाठी ७ लाखांची मदत प्रबोधिनीने केली होती. पिंपळनेरच्या माधव पवार या तरुणाने बिलबम पात्रा हा ब्रँड विकसित केला. या ब्रँडला आता देश-विदेशातून मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...