आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आचारसंहितेमुळे कामांची गती मंदावली:जिल्हा परिषदेत अडीच वर्षांत २७६ ठराव; बांधकामसह ‘लघुसिंचन’ला झुकते माप

अमोल पाटील । धुळे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आल्यावर गेल्या अडीच वर्षात १४ सर्वसाधारण सभेत २७६ ठराव झाले. सर्वाधिक ठराव बांधकाम, लघुसिंचन, आरोग्य विभागाशी निगडीत आहे. काही ठराव मार्गी लागले तर काही अद्यापही कागदावर असल्याचे चित्र आहे. काेरोनामुळे आरोग्य विभागाला सर्वाधिक निधी मिळाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण झाले.

दुसरीकडे आचारसंहिता, पोटनिवडणूक आणि तक्रारींमुळे विकास कामांवर परिणाम झाला. जिल्हा परिषदेची जानेवारी २०२० मध्ये निवडणूक झाल्यावर भाजपचे तुषार रंधे यांची १७ जुलै २०२० मध्ये अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी कुसुम निकम यांची निवड झाली. अध्यक्ष तुषार रंधे यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपला. त्यांना मुदतवाढ मिळाली. गेल्या अडीच वर्षात जिल्हा परिषदेच्या १४ सभा झाल्या. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर विधान परिषद निवडणूकीसाठी आचारसंहिता लागली. त्यानंतर कोरोनाचे संकट आले. तसेच ४ मार्च २०२१ रोजी १६ सदस्य अपात्र झाल्याने पोटनिवडणूक झाली. पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. ही लाट संपल्यावर विधान परिषद निवडणूकीसाठी पुन्हा आचारसंहिता लागली.

अडीच वर्षात १४ पैकी ३ सर्वसाधारण सभा आचारसंहिता कालावधीत झाल्या. या सभांमध्ये २७६ ठराव झाले. तसेच स्थायी समितीच्या ३५ सभांमध्ये २८९ ठराव झाले. विरोधी पक्षाने काही कामांची तक्रार केल्याने ही कामे थांबली. अडीच वर्षात ५५० किमी रस्त्यांचे सक्षमीकरण. लघुसिंचन विभागाच्या २२२ कामांना मंजूरी. ५ आरोग्य केंद्राच्या इमारतीवर प्रत्येकी ७ कोटी ५० लाख खर्च. १५ आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीवर ७५ लाख खर्च ५६ नवीन वर्ग खोल्यांची निर्मिती, १२१ शाळा इमारतींची दुरूस्ती. अंगणवाड्यांची ७० कामे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागातंर्गत ४१४ गावांसाठी ३२२ कोटींच्या ३३० योजना मंजूर. चिमठाणे ८५ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर. पशुसंवर्धन विभागांतर्गत ५ पशुचिकित्सालयासाठी इमारत बांधकाम मंजूर. दालन नुतनीकरणावर ३ कोटी रूपये खर्च. ग्रामीण भागात अशी झाली कामे अन् मंजूर निधी

जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे झाले सक्षमीकरण
कोरोनामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राना १६ रुग्णवाहिका मिळाल्या. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळाले. सेस फंडातून खर्दे आणि दहिवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन प्लांट उभारला गेला.

सभेत मटणावर ताव मारण्याचा मुद्दा गाजला
ज्या दिवशी अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होते त्याच दिवशी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होती. या दिवशी जिल्हा परिषद सदस्यांनी मटणावर ताव मारला. हा विषय खूप गाजला होता. त्यानंतर शिवसेनेच्या सदस्याने जिल्हा परिषदेत प्रतिकात्मक पूजन केले होते. १५ व्या वित्त आयोगाच्या निधी वितरणावरून अध्यक्ष तुषार रंधे यांच्या विरोधात सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी तक्रार केली. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला.

हे ठराव राहिले अद्याप कागदावर
जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सभेत यशवंतराव चव्हाण सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची प्रतिमा बसवण्याचा निर्णय झाला. या ठरावाची अंमलबजावणी झालेली नाही. धावडे आरोग्य उपकेंद्रासाठी नवीन इमारती बांधकामास २०२० मध्ये मंजूरी मिळाली हे काम अद्याप सुरू झाले नाही. सालटेक योजनेची चौकशी, नवोदय विद्यालय रस्ता चौकशी, बोगस शिक्षक मान्यता चौकशी आदी विषय कागदावरच आहे.

बातम्या आणखी आहेत...