आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीसाठी धडपड:पोलिस दलाच्या रिक्त 42 जागांसाठी 3 हजार 796 इच्छुक;आजपासून भरती

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा पाेलिस दलातील ४२ रिक्त जागा भरण्यासाठी उद्या सोमवारपासून शहरातील पोलिस कवायत मैदानावर भरती प्रक्रिया सुरू होते आहे. पोलिस प्रशासनाकडे ३ हजार ७९६ अर्ज आले आहेत. भरतीसाठी सुमारे ४०० पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. भरतीला येणाऱ्या उमेदवारांसाठी पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सोय करण्यात आली आहे. उमेदवारांना पोलिस कवायत मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत सोडले जाईल. त्यामुळे मुख्यालयासमोरील मॉडर्न रोडवर वाहतूक कोंडी होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे.

पोलिस भरतीसाठी उद्या सोमवारी पहाटे साडेपाच वाजता पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येईल. सकाळी साडेसहा वाजेनंतर उमेदवाराच्या कागदपत्रांची तपासणी केल्यावर त्यांना आत सोडले जाईल. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे उपस्थित असतील. पहिल्या दिवशी ८०० उमेदवारांना संधी दिली जाईल. भरती प्रक्रियेसाठी मैदानात सुमारे २८६ अधिकारी व कर्मचारी तैनात असतील. तसेच मैदानाबाहेरही कर्मचारी बंदोबस्तावर राहतील. उमेदवारांसाठी पाणी, स्वच्छतागृहाची सोय करण्यात आली आहे. भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने व्हावी यासाठी सुमारे २० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. छाती व उंची मोजणीसाठी ८ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. मैदानात कागदपत्रांसह विविध प्रकारच्या तपासण्या करण्यासाठी १५ तंबू उभारण्यात आले आहेत. भरती प्रक्रियेचे उंचावरून निरीक्षण करण्यासाठी ३ मनोरे उभारले आहे. ठिकठिकाणी ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत.

प्रथमच तृतीयपंथी उमेदवार पोलिस दलातील ४२ जागांसाठी भरती होणार आहे. या वेळी प्रथमच एका तृतीयपंथी उमेदवाराने अर्ज भरला आहे. या उमेदवाराला ५ जानेवारीला चाचणीसाठी बोलावण्यात आले असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. भरतीची तयारी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...