आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदखेडा तालुक्यातील नरडाणा औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या मेलाणे आणि वारुड शिवारातील १० ते १२ शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाण्याचा रंग तीन महिन्यांपासून बदलला असून, बहुतांश विहिरीतील पाणी लाल झाले आहे. आता हे प्रमाण वाढते आहे. विशेष म्हणजे ५० फूट खोल विहिरीसह ३०० फूट खोल बोअरवेलमधूनही लालच पाणी येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची रासायनिक व जैविक तपासणी केली. तपासणीत हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे आढळले. एमआयडीसीजवळ असलेल्या विहिरींतील पाण्यात रसायनाचा अंश असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच परिसरातील नदीही प्रदूषित झाली असून हा प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
नरडाणा औद्योगिक वसाहतीत सिमेंट, पाॅवर प्लाँटसह अन्य कंपन्या आहेत. या कंपन्याच्या लगत असलेल्या शेत विहिरीतील पाण्याचा रंग बदलला आहे. दोन महिन्यांपूर्वी भागवत पवार यांच्या विहिरीतील पाणी लालसर झाले होते. त्यानंतर आता १२ ते १५ विहिरी तसेच बोअरवेलचे पाणी लालसर झाले आहे. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने पाण्याची रासायनिक आणि जैविक तपासणी केली. जिल्हा आराेग्य प्रयोगशाळेच्या अहवालानुसार या पाण्याला डार्क यलो वॉटर म्हटले जाते. या पाण्यात टोटल हार्डनेस, अल्कनिटी डिसॉल्व सॉलिड घटक वाढले आहे. तसेच अनोळखी रसायन पाण्यात मिसळल्याने हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे अहवालात नमूद आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोशाळेनेही तपासणी केली.
या तपासणीनुसार पाण्यात सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बायकार्बाेनेटचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. त्यामुळे हे पाणी काळजीपूर्वक वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गावातील गुलझार नदीसह भागवत पवार, राजाराम बोरसे, चिंधा बोरसे, शालिग्राम पाटील, नारायण पवार या शेतकऱ्यांच्या शेतातील ५० फूट खोल विहिरीतील पाण्याचा रंग पूर्णत: लालसर झाला आहे. ग्रामसेविका मनीषा पाटील यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या विहिरीतील पाण्याची तपासणी केली आहे. या विहिरीतील पाणी पिण्यास योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लाल पाण्यामुळे चिंता वाढली आहे.
ग्रामपंचायतीचा पाठपुरावा, उपयोग शून्य
याविषयी सरपंच, ग्रामसेवकांनी १८ डिसेंबरला तहसीलदारांकडे तक्रार केली. त्यानंतर २४ नोव्हेंबरला पाणी तपासण्यासाठी आरोग्य विभागाला पत्र दिले. तलाठ्यांनी पंचनामा करून २४ नोव्हेंबरला अहवाल तहसीलदारांना दिला. पंचनाम्यावर ७ शेतकऱ्यांच्या सह्या आहे. त्यानंतर २६ नोव्हेंबरला उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पण उपयोग झालेला नाही. जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
आयर्न, झिंक, ऑक्साइडमुळे पाण्याचा रंग बदलतो
याविषयी झेड. बी. पाटील महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. प्रवीणसिंग गिरासे यांनी सांगितले की, पाण्यात आयर्न, झिंक, ऑक्साइड संयुक्त झाले तर पाण्याला पिवळसर पणा येतो. तसेच मॅगनिज, खनिज पाण्यात अधिक प्रमाणात वाढले तरीही पाण्याचा रंग बदलतो. त्यामुळे या पाण्याची सखोल तपासणी करणे आवश्यक आहे. पाण्यात रासायनिक पदार्थ जास्त प्रमाणात असतील तर हे पाणी पिण्यासाठी घातक असेल.
गुलझार नदीचे पाणीही आता झाले दूषित
मेलाणे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीपासून २०० मीटर अंतरावर गुलझार नदी आहे. नदीच्या पात्रात ५० बाय १०० मीटर आकाराच्या १५ फूट खोल खड्ड्यात पाणी आहे. हे पाणीही दूषित झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी २६ जानेवारीला याच पाण्यात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.
पाणी प्याल्यास पोटात दुखते
सिमेंट कंपनीला लागून शेती आहे. शेतातील दोन्ही विहिरींचे पाणी लाल झाले आहे. हे पाणी पिल्यावर पोटात दुखते. गुरे पाणी पित नाही. तक्रार केली तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. -भागवत पवार,शेतकरी वारुड
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.