आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी:37 हजार क्विंटल बियाणे खरीप हंगामासाठी लागणार; महाबीजसह अन्य कंपन्यांकडे प्रशासनाने नोंदवली मागणी

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पूर्व मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. यंदा सरासरी ४ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यासाठी ३७ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. बियाणे मुदतीत प्राप्त व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यासाठी कपाशीच्या १ लाख १५ हजार ४०० पाकिटे उपलब्ध होणार आहे. बियाणे आणि खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी सहा भरारी पथक नेमली आहे.

यंदा मृग नक्षत्रात पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात यावर्षी ३ लाख ९० हजार ४८ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट आहे. सोयाबीन वगळता इतर पिकांसाठी ३२ हजार ९३८ क्विंटल बियाण्यांची गरज आहे. बियाण्यांची मागणी महाबीजसह सार्वजनिक आणि खासगी कंपन्याकडे नोंदवण्यात आली आहे. मागणीनुसार मुदतीत पुरवठाही सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यांची टंचाई जाणवणार नाही. कपाशीच्या १ लाख १५ हजार ४०० पाकिटांची गरज आहे. त्यात ५ हजार ७७० पाकिटे सार्वजनिक तर १ लाख ९ हजार ६३० पाकीट हे खासगी कंपनीकडून उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात येत्या हंगामात २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी १७ हजार १२५ क्विंटल सोयाबीनच्या बियाण्यांची गरज आहे.

मागील वर्षाच्या खरीप हंगामात ग्राम बीजोत्पादन मोहिमेद्वारे तयार झालेले बियाणे, शेतकऱ्यांनी स्वत:कडे राखून ठेवलेले बियाणे असे स्थानिक पातळीवर ११ हजार १२५ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. या व्यतिरिक्त ६ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची गरज आहे. तसेच २ हजार क्विंटल सार्वजनिक तर ४ हजार क्विंटल बियाणे खासगी कंपनीकडून उपलब्ध होणार आहे.

बियाण्यांची गरज अशी
जिल्ह्यात संकरित ज्वारीच्या बियाण्यांची ७९५ क्विंटल, सुधारित ज्वारीच्या ५ क्विंटल, संकरित बाजरीच्या १ हजार ३७४ क्विंटल, सुधारित बाजरीच्या ६ क्विंटल, भातच्या २ हजार ६४० क्विंटल, नागलीचे २३ क्विंटल, भुईमुगाचे ८ हजार १०० क्विंटल, सूर्यफुलाचे १५ क्विंटल, तीळचे ५ क्विंटल, तुरीचे ६०८, मुगाचे १ हजार ८२३ क्विंटल, उडदाचे ६०८ क्विंटल, मक्याचे ११ हजार ७०० क्विंटल, सुधारित कापूस ४५ क्विंटल बियाणे लागेल.

बियाणे खरेदी करताना पावती घ्या
शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदीची पावती, खरेदी केलेल्या बियाणे पाकिटाचे टॅग व लॉट क्रमांक पडताळून पाहावा. पेरणी झाल्यावर बियाण्याचे पाकीट पीक निघेपर्यंत सांभाळून ठेवावे. खते खरेदी करताना बिल घ्यावे. खत विक्रेता जास्त दराने युरियासारख्या अनुदानित खतांची विक्री करत असेल, तसेच झीरो बिल पावतीवर खतांची विक्री करत असेल, तर त्याबाबत कृषी कार्यालयाकडे लेखी तक्रार करावी.

मुबलक खतसाठा असल्याने भटकंती टळणार
जिल्ह्यासाठी १ लाख ४ हजार ४०० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. तसेच मागील वर्षाचा १६ हजार ६४६ मेट्रिक टन खतसाठा शिल्लक असून, एकूण १ लाख १७ हजार ४६ मेट्रिक टनखत साठा उपलब्ध होणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा २३ हजार मेट्रिक टन अतिरिक्त खतसाठा मिळणार आहे.

काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथके नेमली
खरीप हंगामात शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे उपलब्ध व्हावे तसेच शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी तालुकास्तरावर चार व जिल्हास्तरावर एक अशी एकूण पाच भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांमार्फत बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यात येणार आहे. अनधिकृतरीत्या विक्री होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीला प्रतिबंध केला जाईल.

बातम्या आणखी आहेत...