आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयुक्त कारवाई:भोरखेड्यातून 54 किलो वजनाचा 6 लाख 50 हजारांचा गांजा जप्त; झोपडीत विक्री, एलसीबी, थाळनेर पोलिसांचा छापा

शिरपूर, धुळेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भोरखेडा शिवारातील एका झोपडीतून तब्बल ५४ किलो ५०० ग्रॅम वजनाचा ६,५४,००० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात थाळनेर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.

भोरखेडा शिवारात असलेल्या कांजणीपाडा येथील एका झोपडीत गांजाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. भोरखेडा शिवारात असलेल्या कांजणीपाडा येथे तानक्या ऊर्फ टकल्या पावरा याच्या पडक्या झोपडीत त्याचा जावई गोपाल मेहेरबान पावरा (रा. लाकड्या हनुमान, ता.शिरपूर) यांनी संगनमत करून गांजासदृश अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेला आहे. हे ठिकाण थाळनेर पोलिस स्थानकाच्या हद्दीतील असल्याने शिवाजी बुधवंत यांनी पोसई योगेश सीताराम राऊत, थाळनेरचे उपनिरीक्षक उमेश बोरसे, नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, पोहेकॉ संदीप सरस, कमलेश सूर्यवंशी, मयूरी पाटील, राहुल गिरी, विशाल शिवाजी गायकवाड, पोस्टेचे अंमलदार प्रकाश मालचे, दिनेश महाले, रईस शेख, दिलीप मोरे आणि हे पथक संयुक्त कारवाई करण्यासाठी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचताच झोपडीत बसलेला गोपाल मेहेरबान पावरा यास पोलिस आल्याची चाहूल लागताच तो झोपडीतून अंधाऱ्याचा फायदा घेत पळून गेला. याप्रकरणी पोलिस कर्मचारी महेंद्र देवराम सपकाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून थाळनेर पोलिस ठाण्यात गोपाल मेहेरबान पावरा व तानक्या ऊर्फ टकल्या पावरा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल कला आहे.

जप्त मुद्देमाल असा
पडक्या झोपडीत दोन प्लास्टिकच्या मोठ्या गोण्यांमधे हिरवट ओलसर असलेला ४४ किलो गांजासदृश अमली पदार्थ, तसेच एका हिरव्या रंगाच्या लहान प्लास्टिकच्या गोणीत १० किलो ५०० ग्रॅम गांजासदृश अमली पदार्थाचा चुरा, अंदाजित किंमत प्रति किलो १२,००० रुपये प्रमाणे असा एकूण ५४ किलो ५०० ग्रॅम वजनाचा ६,५४,००० रुपये किमतीचा गांजा व गांजाचा चुरा असा मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनामा करून जप्त करण्यात आला.