आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासात अंश तापमानात कुडकुडत्या थंडीत पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून रविवारी रात्रीच शहरात आलेल्या उमेदवारांच्या राहण्याची सोय पोलिस प्रशिक्षण केंद्रात केली होती. त्यामुळे रात्री १०० उमेदवारांनी प्रशिक्षण केंद्रात मुक्काम केला. त्यानंतर सोमवारी पहाटेच पोलिस मैदान गाठले. भरतीसाठी पहिल्याच दिवशी आलेल्या ८०० पैकी ३२६ उमेदवार प्राथमिक चाचणीत पात्र ठरले. उद्या मंगळवारी पुन्हा ८०० उमेदवारांना बोलावण्यात आले आहे. त्यांच्या राहण्याची सोय पोलिस प्रशिक्षण केंद्रात केली आहे.
पोलिस भरतीसाठी सन २०२१ मध्ये अर्ज भरण्यात आले होते. त्यानंतर आता सोमवारपासून प्रत्यक्ष भरती सुरू झाली. पहिल्या दिवशी ८०० उमेदवारांना बोलावले होते. त्यात शहराबाहेरील २०० जणांचा समावेश होता. पोलिस मुख्यालयाजवळ रविवारी रात्री थंडीत हे उमेदवार थांबून होते. ही बाब लक्षात आल्यावर अप्पर पोलिस अधीक्षक तथा प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य किशोर काळे यांनी त्यांच्या राहण्याची पोलिस प्रशिक्षण केंद्रात सोय केली.
सुमारे १०० तरुणांनी या ठिकाणी रात्री मुक्काम केला. त्यानंतर सकाळी हे उमेदवार नव्या दमाने भरतीला उभे राहिले. सकाळी साडेसात वाजता भरती प्रक्रिया सुरू झाली. उमेदवारांना ओळखपत्र व कागदपत्रे पाहून आत सोडले जात होते. दिवसभरात ८०० उमेदवारांची चाचपणी झाली. त्यातून ३२६ उमेदवार पात्र ठरल्याची माहिती देण्यात आली.
अशी राबवली प्रक्रिया
भरतीसाठी येणारा उमेदवार तोच आहे का याची खात्री करून पोलिस ओळखपत्र देतात. त्यावर उमेदवाराचीही सही असते. त्यानंतर उंची, छाती मोजणीनंतर गोळाफेक व १०० व १६०० मीटर धावण्याची स्पर्धा होते. तसेच उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
खाकीविषयी आदर
पोलिस प्रशिक्षण केंद्रात राहण्याची सोय केल्यामुळे थंडीपासून बचाव झाला. तसेच पहाटे वेळेवर मैदानावर येणे शक्य झाले. त्यामुळे थकवा जाणवला नाही. अधिकाऱ्यांचे प्रयत्न कौतुकास्पद असून पोलिसांविषयी आदर वाढला आहे.-चैतन्य कोकणी, उमदेवार, पिंपळनेर
थंडीचा कडाका वाढला असून बाहेर थांबणाऱ्या उमेदवारांची प्रकृती बिघडू शकते. त्यामुळे प्रशिक्षण केंद्रात त्यांच्या राहण्याची सोय होती. मुख्यालयात थांबलेल्या तरुणांपर्यंत हा निरोप दिला होता. या ठिकाणी केवळ उमेदवारांना नियमांच्या अधीन राहून मुक्काम करता येईल.-किशोर काळे, अप्पर पोलिस अधीक्षक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.