आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र दिन:खरिपासाठी 710 कोटी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट; पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

धुळे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिस मैदानावर मुख्य कार्यक्रम, पथसंचलनासह विविध योजनांची दिली माहिती, जिल्हाभरात उत्साह

जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. खरीप हंगामात ४ लाख १७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत वितरण करण्याची सूचना केली आहे. यंदा ७१० कोटी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस कवायत मैदानावर ध्वजवंदन झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, महापौर प्रदीप कर्पे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे उपस्थित होते. पोलिस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली. पथसंचलनाचे नेतृत्व पोलिस उपअधीक्षक प्रदीप मैराळे यांनी केले. पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, कोरोनामुळे दोन वर्षे निर्बंध लागू होते. आता तशी स्थिती नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या. लसीकरणाला प्राधान्य दिले. अद्याप कोरोनाचे संकट संपलेले नाही. त्यामुळे प्रत्येकाने गर्दीच्या ठिकाणी मास्क लावावा.

ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी घ्यावी. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मदतनिधी मिळतो आहे. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या १६ बालकांना प्रत्येकी पाच लाख दिले. जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. संबंधितांना भरपाई दिली. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ २८ टक्के जलसाठा असल्याने प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा. प्रशासनाने टंचाई निवारण्यासाठी १ कोटी २४ लाखांचा कृती आराखडा केला आहे. जिल्ह्यातील ४५ हजार ४९६ शेतकऱ्यांना ३४६ कोटी पेक्षा जास्त कर्जमुक्ती मिळाली.

रोज २ हजार ८०० शिवभोजन थाळ्या
पालकमंत्री सत्तार म्हणाले की, वार्षिक योजनेत सन २०२२-२३ मध्ये सर्वसाधारणसाठी २३६ कोटी रुपये, आदिवासी उपयोजनेसाठी ११८ कोटी रुपये तर विशेष घटक योजनेसाठी ३० कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. शिवभोजन योजनेतून जिल्ह्यात रोज २ हजार ८०० थाळ्यांचे वितरण होते. आतापर्यंत १५ लाख २० हजारांपेक्षा जास्त गरजूंनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

३ लाख ७४ हजार सातबारा उतारे वाटप
पालकमंत्री सत्तार म्हणाले की, शासनाने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने मोबाइल ॲपद्वारे ई-पीक पाहणी आज्ञावली विकसित केली. जिल्ह्यातील २ लाख ९९ हजार ९५४ शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणीत सहभाग नोंदवला. शासनाने नवीन नमुन्यातील सातबारा शेतकऱ्यांना घरपोच देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ३ लाख २२ हजार ८२२ शेतकऱ्यांना ३ लाख ७४ हजार ३४३ सातबारा उताऱ्यांचे वाटप केले आहे. राज्य शासनाच्या विविध सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. आता शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी ३५, शिक्षकांसाठी ७० सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित केल्या आहेत. शिक्षण विभागाच्या एकूण १०५ सेवा सेवा हमी कायद्यात समाविष्ट झाल्याने विद्यार्थी, शिक्षक, पालकांना फायदा होईल, असेही पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

आवास योजनेतही आघाडी
जिल्ह्यात पंतप्रधान आवास ग्रामीण योजनेंतर्गत ब यादीत ४६ हजार ४७१ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत ४० हजारांवर घरकुले पूर्ण झाली आहे. महाआवास अभियानांतर्गत जिल्ह्याला द्वितीय क्रमांक मिळाला. या योजनेच्या ड यादीत जिल्ह्याला १८ हजार ३४ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट आहे. सन २०२१-२२ मध्ये ९ हजार ८८७ लाभार्थ्यांना ऑनलाइन मंजुरी दिली. महसूल प्रशासन लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियान आपल्या जिल्ह्यात राबवण्यात येते आहे. या अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत १ लाख २० हजार ४७९ दाखल्यांचे वाटप झाले असल्याचे पालकमंत्री सत्तार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...