आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या मतमाेजणी:ग्रा.पं.साठी 79 टक्के मतदान; काही केंद्रांत साडेपाचनंतर रांग

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ११८ ग्रामपंचायतींसाठी रविवारी ४६४ मतदान केंद्रांत सरासरी ७९ टक्के मतदान झाले. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर मतदान केंद्राच्या आवारात असलेल्यांना मतदानाचा हक्क बजावण्यास परवानगी मिळाली. त्यानुसार फागणे, मुकटी, न्याळहाेद, नगाव येथील केंद्रात शंभरपेक्षा अधिक मतदारांना मतदान करता आले. या ठिकाणी रात्री साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू हाेती. मतमोजणी उद्या मंगळवारी (दि.२०) होईल.

जिल्ह्यातील १२८ पैकी १० ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या. त्यामुळे उर्वरित ११८ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि.१८) मतदान झाले. जिल्ह्यात २ लाख ६४ हजार ७२७ मतदार हाेते. त्यापैकी सरासरी ७९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. धुळे तालुक्यातील फागणे, नगाव या ग्रामपंचायतीत मतदान केंद्रात सकाळी आठपासूनच गर्दी हाेती. पहिल्या दाेन तासांत जिल्ह्यात १५ तर पुढील दाेन तासांत आणखी १५ टक्के मतदान झाले हाेते.

काही केंद्रात ईव्हीएम सुरू करताना अडचणी आल्याने पाच ते दहा मिनिटे उशिराने मतदानाला सुरुवात झाली. एकाही केंद्रात यंंत्र बदलण्याची वेळ आली नाही. दुपारी बारानंतर काही केंद्रात गर्दी वाढली होती. त्यानंतर ती कमी झाली. पुन्हा दुपारी चारनंतर गर्दी वाढली. नगाव, मुकटी, फागणे व न्याहळाेद येथे रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू हाेती. किरकाेळ शाब्दिक वाद वगळता मतदान शांततेत झाले.

पाेलिस,प्रशासन पथकाच्या केंद्रांना भेटी
निवडणुकीसाठी जवळपास अडीच हजार कर्मचारी नियुक्त हाेते. याशिवाय पाेलिस तैनात होते. पाेलिस अधीक्षक संजय बारकुंड, तहसीलदार गायत्री सैंदाणे, अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांनी विविध केंद्राला भेेट दिली.

लग्नापूर्वी मतदानाचे कर्तव्य
फागणे येथील सीमा कुंभार या युवतीचा रविवारी विवाह होता. विवाहापूर्वी जिल्हा परिषद शाळेतील केंद्रात जात तिने मतदान केले. तसेच धमाणे येथील पूजा संजय ठाकूर या नववधूनेही मतदान केले.

साडेतीनपर्यंत ६६ टक्के मतदान
जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६५.९० टक्के मतदान झाले हाेते. सर्वाधिक मतदान साक्री तालुक्यात ६८.५८ टक्के झाले हाेते. त्या खालाेखाल शिंदखेडा तालुक्यात ६७.३० टक्के, धुळे तालुक्यात ६३.७४ टक्के तर शिरपूर तालुक्यात ६३.४९ टक्के मतदान झाले हाेते. दुपारी साडेतीनपर्यंत १ लाख २८ हजार ६६५ महिला मतदारांपैकी ८७ हजार ६५ तर १ लाख ३६ हजार २९ पुरुष मतदारांपैकी ८७ हजार ४९८ मतदारांनी मतदान केले होते.

मंगळवारी हाेणार मतमाेजणी
धुळे तालुक्यात ३०, साक्री तालुक्यात ५०,शिरपूर तालुक्यात १६, शिंदखेडा तालुक्यात २२ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. मतमाेजणी मंगळवारी (दि.२०) राेजी तालुकास्तरावर हाेणार आहे. धुळे तालुक्याची मतमाेजणी जेलराेडवरील तांत्रिक विद्यालयात हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...