आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शिरपूर तालुक्यातील २० वर्षीय तरुणाला ग्रासले सायकोसीस आजाराने; पालकांनी मुलांकडे वेळीच लक्ष द्यावे

अमोल पाटील | धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइलच्या अतिरेकी वापराचे प्रमाण वाढले आहे. त्यातही शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण मोबाइलच्या व्यसनात अडकत चालली आहेत. त्यातून सायकोसीस सारखा धोका बळावत आहे. फ्री फायर गेम मध्ये रममाण झालेला शिरपूर तालुक्यातील २० वर्षीय तरुण सध्या मानसिक आजाराने ग्रस्त आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मोबाइलच्या अतिरेकी वापराचे संकट कालपर्यंत मोठ्या शहरापर्यंत होते. मात्र आता थेट ग्रामीण भागातही घोंगावत आहे.

कोराेनाच्या दोन वर्षांपर्यंत शाळा बंद असल्याने या कालावधीत शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोबाइलचा वापर अधिक वाढला आहे. लहान मुलांना तर हातात मोबाइल असल्या शिवाय मुले जेवायला बसत नाहीत. मोबाइलमध्ये कार्टून बघत, गाणी बघत किंवा गेम खेळत जेवण करण्याची ही सवय अतिघातक आहे. कोरोनाच्या कालावधीत ऑनलाइन क्लाससासाठी हातात दिलेला हा मोबाइल आता मुलांचे व्यसन बनलेले आहे. यातून मानसिक आजार निर्माण झाल्याचे समोर येत आहे. शिरपूर तालुक्यातील एका खेडे गावातील २० वर्षाचा तरुण फ्री फायर गेमच्या मोहाने मानसिक आजाराचा शिकार झाला आहे. शेतकरी आई -वडिलांचा २० वर्षीय तरुण मुलगा अचानक घरात हाताच्या इशाऱ्याने बंदूक चालवण्याचे हावभाव करत होता. गावात चौकातही मुलांना हाताच्या बंदुकीने ठोठो करू लागला. या प्रकाराने भयभीत झालेल्या पालकांनी या तरुणाला आधी जवळच्या खासगी डॉक्टरांना दाखवले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात तेथून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालयातून धुळे शहरातील खासगी रुग्णालयात या तरुणाला हलवण्यात आले आहे. सध्या धुळे शहरातील एका रुग्णालयात या तरुणावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत. हा तरुण पूर्णत: फ्री फायर गेमच्या आहारी गेल्याने आपण बंदूकच चालवत असल्याचा भास त्याला होत आहेत. शिवाय समोर असलेला प्रत्येक व्यक्ती शत्रू असून, त्याला बंदुकीने मारले पाहिजे म्हणून तो धडपडत आहे. मोबाइलच्या अतिवापराने झालेली तरुणाची ही अवस्था पाहताना आई-वडीलदेखील हतबल झाले आहेत. इतर व्यसनाप्रमाणे मोबाइलही व्यसन आहे. हे वेगवेगळ्या संशोधनात सिद्ध झाले आहे. या व्यसनापासून स्वत:सह आपल्या पाल्याचा बचाव करण्याचे मोठे आवाहन पालकांच्या समोर आहे.

पालकांनी मुलांच्या मोबाइल वापरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे
मोबाइलच्या अतिवापराने झोपेचे भान राहत नाही. हळूहळू झोपेची वेळ सुटते आणि कधीही रात्री-अपरात्री झोप येते आणि सकाळी झोप पूर्ण सुद्धा होत नाही. मुलांना याचा मोठा फटका बसू शकतो. कारण झोप न आल्याने आणि ती पूर्ण न झाल्याने त्यांच्या शालेय जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. मुलाची बौद्धिक क्षमता कमकुवत पडू शकते. शिवाय फ्री फायर, पब्जी आणि तत्सम मोबाइल्स गेम्समुळे सायकोसीस सारखा धोकादेखील आहे. यामुळे मुलांच्या मोबाइल वापरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
डॉ.जीवन पवार, मानसोपचारतज्ज्ञ, धुळे

बातम्या आणखी आहेत...