आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणपूल:मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव चौफुली, शंभर फुटी रस्ता, आर्वीजवळ होणार उड्डाणपूल

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या बाहेरून जाणाऱ्या व चोवीस तास वाहनांची वर्दळ असलेल्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर नाशिक ते धुळे दरम्यान सहा उड्डाणपुल बांधण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तत्वत: मान्यता दिली आहे. त्यापैकी तीन उड्डाणपुल धुळे तालुक्यात होतील. त्यातील एक उड्डाणपुल शहराजवळील चाळीसगाव चौफुलीवर असेल. हा उड्डाणपुल रेल्वे मार्गाजवळ सद्य:स्थितीत असलेल्या उड्डाणपुलाला जोडण्यात येईल. त्यामुळे चाळीसगाव रोड चौफुलीवरील वाहतुकीची कोंडी फुटेल. तसेच शंभर फुटी रस्ता व आर्वी येथील शिरूड चाैफुलीजवळही उड्डाणपुल असेल.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग धुळे आणि नाशिक जिल्ह्यातून जातो. धुळे ते नाशिक या दोन शहराच्या दरम्यान महामार्गावर सहा ब्लॅक स्पॉट अर्थात अपघात प्रवण ठिकाण आहे. त्यापैकी तीन धुळे जिल्ह्यात आणि तीन नाशिक जिल्ह्यात आहे. या सहा ठिकाणी वाहतूकीची कोंडीही हाेते. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी होत होती. वाहतूक कोंडी सुटावी आणि अपघाताचे प्रमाण शुन्य टक्क्यावर यावे यासाठी उड्डाणपुल उभारण्यास तत्वत: मंजूरी मिळाली आहे.

शहरातील चाळीसगाव रोड चौफुली व शंभर फुटी रस्ता, तसेच धुळे तालुक्यातील आर्वी येथील शिरुड चौफुली या तीन ठिकाणी नव्याने उड्डाणपुल होणार आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहराजवळील टेहेरे फाटा, चाळीसगाव फाटा व चांदवड चौफुली येथे उड्डाणपूल होईल. उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी अंदाजे ५० कोटी खर्च अपेक्षित आहे. या कामाला प्रारंभ करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नाशिक व धुळे कार्यालयाकडून हे काम होणार असल्याची माहिती देण्यात आली. कामासाठी आवश्यक हालचाली सुरू झाल्या आहे.

शहराजवळ दोन उड्डाणपूल जोडणार
गुरूद्वारसमोर उड्डाणपुल आहे. रेल्वे क्रॉसिंगचा पुल चाळीसगाव रोड चौफुलीच्या अलीकडे संपतो. चाळीसगाव चौफुली येथे नेहमी वाहतुक कोंडी होते. त्यामुळे या ठिकाणी पुल होईल. शिवाय हा पुल जेथे संपेल तेथून पुढे नव्याने मंजूर असलेला १०० फुटी रस्त्यावरील उड्डाणपुल सुरु होईल. हा पुल चाळीसगाव रोड चौफुलीजवळील पुलाला जोडण्यात येईल. तसेच पुढे वडजाई रोड ओव्हरब्रीजला हा पुल जोडण्यात येईल.

काय होणार फायदा
मुंबई-आग्रा महामार्गावर चोवीस तास वर्दळ असते. मुंबईच्या जेएनपीटी बंदराला हा महामार्ग जोडला आहे. देशातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या महामार्गापैकी एक हा महामार्ग आहे. प्रस्तावित उड्डाणपुलांच्या कामामुळे महामार्गावरील अपघाताच्या घटनांना आळा बसून वाहतुक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. शिवाय दळणवळण अतिशय जलद होण्यास मदत होणार आहे.

दुर्लक्ष | देवभाने फाट्यावर होतात अपघात
महामार्गावरील देवभाने फाटा येथेही सातत्याने अपघात होतात. अपघात झाल्यावर रास्ता रोको आंदोलन केले जाते. या ठिकाणीही उड्डाणपुल उभारण्याची मागणी होते आहे. तीन उड्डाणपुल मंजूर करतांना देवभाने फाट्याजवळ उड्डाणपूल बांधण्याची मागणी दुर्लक्षित झाली. त्यामुळे या विषयाकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

वाहतुकीची कोंडी | पोलिसांचा अहवाल महत्त्वाचा
चाळीसगाव रोड चौफुलीवर नेहमी वाहतुकीची कोंडी होते. तीच स्थिती आर्वी-शिरुड जंक्शन येथे असते. त्यामुळे या ठिकाणी फ्लायओव्हर करावा असा प्रस्ताव धुळे महामार्ग पोलिसांनी सुचवला होता. तसेच लोकप्रतिनिधी, सामाजीक संघटनांची ही मागणी रेटून धरली होती. त्यानूसार हे उड्डाणपुल मंजूर करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...