आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालव्ह जिहाद व धर्मांतरणविरोधी कायदा लागू करावा या मागणीसाठी रविवारी शहरातून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे जनआक्रोश मोर्चा निघाला. मोर्चात भगवी टोपी, पटका परिधान करत हातात भगवा ध्वज घेत अनेक जण सहभागी झाले. विशेष म्हणजे महिला व युवतींची संख्याही लक्षणीय होती. शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा निघाला. विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त वाढवला होता.
शहरातील मालेगावरोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ मोर्चासाठी सकाळी नऊ वाजेपासूनच विविध भागातून हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, नागरिक, महिला, युवती, युवक घोषणा देत येत होते. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा सुरू झाला. मोर्चाच्या अग्रस्थानी भगवा ध्वजधारी होते. त्यानंतर तरुणी, महिला होत्या. सर्वात शेवटी राजकीय पक्षाचे पदाधिकारी होते.
हा मोर्चा पाचकंदील, कराचीवाला खुंट, फुलवाला चाैक, महाराणा प्रताप पुतळा, झाशी राणी पुतळा, मनपा, डॉ. पां. रा.घाेगरे चौकातून जेलरोडवर आला. तेथे सुरेश चव्हाणके यांनी मनोगत व्यक्त केले. मोर्चात संजय शर्मा, खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर प्रदीप कर्पे, मनपा स्थायी समिती सभापती शीतल नवले, गौरव जगताप, राजू महाराज, जयश्री अहिरराव, नगरसेविका प्रतिभा चौधरी, डॉ. माधुरी बोरसे, मनोज मोरे, सतीश महाले, प्रवीण अग्रवाल, डॉ. विपुल बाफना आदी सहभागी झाले.
बारा दिवसांपासून तयारी
मोर्चात महिला स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्या. महिला, युवतींनी मोर्चात सहभागी व्हावे यासाठी वैष्णवी मराठे यांच्यासह अन्य तरुणींनी बारा दिवस शहरातील विविध भागात जागृती केली. तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे दोन हजार स्वयंसेवक प्रयत्नशील होते. स्वयंसेवकांनी मोर्चात पायात चप्पल न घालता, पांढरी टोपी घालून कंबरेला भगवा पटका बांधत कपाळावर टिळा लावून सहभाग नोंदवत शिस्तीचे दर्शन घडवले. स्वयंसेवकांनी संपूर्ण मोर्चाला मानवी साखळी केली होती.
प्रत्येक चौकात पोलिस
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक चौकात बॅरिकेेटिंग केले होते. दंगा नियंत्रण पथक तैनात केले होते. सहायक पोलिस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे आदी रस्त्यावर होते.
जिल्हाधिकारी सभास्थळी
निवेदन घेण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी सत्यम गांधी सभास्थळी आले. महिला अत्याचाराच्या प्रकरणांची जलदगती न्यायालयात सूनावणी व्हावी, जोपर्यंत खटला चालतो तोपर्यंत संशयितांना जामीन मिळू नये आदी मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.