आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:गुलाब जामची पाकिटे नेणारा ट्रक तापीत कोसळला; चालकाचा मृत्यू

शिरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूरपासून काही अंतरावर असलेल्या सावळदे येथील पुलावरून आयशर ट्रक तापी नदीत पडला. ही घटना गुरुवारी सकाळी आठ ते नऊ वाजेच्या सुमारास झाली. या घटनेत चालकाचा मृत्यू झाला. सहचालकाला वाचवण्यात यश आले. नदीत पडलेल्या आयशरमध्ये गुलाब जामच्या पिठाची पाकिटे व पास्ता होता.

मुंबई-आग्रा महामार्गावरून गुरुवारी आयशर क्रमांक सीजी-०७-सीजी-८९७० पुणे येथून मध्य प्रदेशातील जुलवानिया येथे गुलाब जामचे पीठ आणि पास्ताचे पाकिटे घेऊन जात होता. हे वाहन सकाळी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान सावळदे येथील निम्स कॉलेज लगत तापीवरील असलेल्या पुलावरून जात होते. या वेळी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे आयशर पुलाचे कठडे तोडून नदीत कोसळला.

घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार आबा महाजन, पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी सहचालक दिलीप अमरसिंग ब्राम्हणे (वय १८ रा. देवला बामनिया पुरा. ता. राजपूर जि. बडवानी) याला मासेमारी करणाऱ्यांनी वाचवले. या घटनेत चालक धर्मेंद्र डावर रा. सांगवी निम जि. जुलवनिया याचा केबिनमध्ये मार लागून जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त आयशर राहुल रामदास साहू रा. ओझर ता. राजपूर जि. बडवानी यांच्या मालकीचा आहे. या प्रकरणी नोंद झाली.

बातम्या आणखी आहेत...