आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकापडणेसह परिसरात एक आठवड्यापूर्वी वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. पण अद्यापही या भागात महसूल विभागाचे कर्मचारी पंचनामे करण्यासाठी आलेले नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याविषयाकडे लक्ष द्यावे. तसेच नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कापडणेसह परिसरात ६ मार्चला सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वारा होता. त्यामुळे मका, गहू, शेवग्याची बाग आदी पिकांचे नुकसान झाले. वाऱ्यामुळे गहू, मका आडवा झाला तर शेवगा शेंगाची झाडे उन्मळून पडली. या घटनेला आता एक आठवडा उलटला तरी अद्यापही महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी पंचनामे करण्यासाठी बांधावर आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
वादळी वाऱ्यामुळे शांताराम पंढरीनाथ पाटील, शिवाजी टिपू पाटील, बेबीबाई लोटन पाटील आदींसह अनेक शेतकऱ्यांच्या मक्याचे नुकसान झाले आहे. शांताराम पाटील यांनी साडेतीन महिने काबाडकष्ट करून पिकवलेला दोन एकर क्षेत्रातील मका उन्मळून पडला आहे. त्यामुळे त्यांचे अंदाजे एक लाखा पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. आता मक्यातील दाणे खराब होण्याची शक्यता आहे. तसेच चाराही खराब झाला आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
विलंबाची विचारणा करू
तालुक्यात ज्या ठिकाणी जास्त नुकसान झाले आहे. त्याठिकाणी कृषी सहायक व तलाठी आधी पंचनामे करत आहे. इतर तालुक्यांपेक्षा धुळे तालुक्यात नुकसान कमी आहे. कापडणे परिसरात पंचनामे का झाले नाहीत याबाबत संबंधित कृषी सहायकांना विचारण केली जाईल. - वाल्मीक प्रकाश, तालुका कृषी अधिकारी, धुळे
त्वरित पंचनामे करा
याविषयी शेतकरी शांताराम पाटील यांनी सांगितले की, वादळी वाऱ्याला एक आठवडा उलटला तरी अद्याप पंचनामा झाला नाही. मका शेतात आडवा पडला आहे. महसूल विभागाने तातडीने पंचनामे करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
हातातांेडाशी आलेला घास गेला
यंदा मुबलक पाऊस झाला. त्यामुळे रब्बी हंगामातील मका लागवडीचा फायदा होईल, असे वाटत होते. पण वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले. हवामान विभागाने पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसे झाल्यास हाती काहीच येणार नाही. - राजेंद्र काशिनाथ माळी, शेतकरी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.