आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकाच विद्यार्थ्याला प्रवेश दोन ठिकाणी दाखवत होणारी शासकीय अनुदानाची लूट थांबवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार क्रमांक यूडायस प्रणालीवर अपलोड करण्याची सक्ती आहे. पण अद्यापही ४१ हजार २० विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक यूडायसवर अपलोड झालेले नाही. तसेच ९८७ विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंद एकापेक्षा जास्त शाळेत आहे. याशिवाय ८० हजार विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक इनव्हॅलिड अर्थात अवैध असल्याचे आढळून आले.
शाळेत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्तीसाठी आधार क्रमांक आवश्यक असतो. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार क्रमांक यूडायस प्रणालीवर अपलोड करण्याचे निर्देश काही दिवसांपूर्वी देण्यात आले होते. जिल्ह्यात पहिली ते बारावीचे ४ लाख ८९ हजार ५६४ विद्यार्थी आहे. त्यापैकी आत्तापर्यंत ४ लाख ४८ हजार ५४४ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक यूडायसवर अपलोड झाले आहे.
तसेच अद्याप ४१ हजार २० विद्यार्थ्यांचे क्रमांक अपलोड झालेले नाही. अपलोड केलेल्या आधार क्रमांकपैकी ३ लाख ३ हजार ४८० आधार क्रमाक वैध असून, तब्बल ८० हजार १४८ आधार इनव्हॅलिड अर्थात अवैध आहे. इनव्हॅलिड आधार कार्डमध्ये काहींचे लिंग चुकीचे दर्शवले असून काही विद्यार्थ्यांची जन्मतारीख चुकीची आहे. काहींचे नाव व जन्मतारीख जुळत नाही. काही विद्यार्थ्यांचे नाव आणि लिंग विभिन्न आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अद्याप आधारकार्ड काढलेले नाही तसेच ज्यांच्या आधार कार्डमध्ये त्रुटी आहे त्यांचे आधारकार्ड अपडेट करून ते यूडायस प्रणालीवर अपलोड करण्याचे निर्देश दिले गेले आहे.
धुळे तालुका आघाडीवर
आधार क्रमांक अपलोड करण्यात धुळे तालुका आघाडीवर आहे. धुळे तालुक्यातील १ लाख ७ हजार ४१० पैकी १ लाख २ हजार १७८ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपलोड झाले आहे. शिरपूर तालुक्यात ९१ हजार १४६, महापालिका क्षेत्रात ८९ हजार ८७०, शिंदखेडा तालुक्यात ६५ हजार १७५ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपलोड झाले आहे. साक्री तालुक्यात १ लाख १२ हजार ६२२ पैकी १ लाख १ हजार ७५ विद्यार्थ्यांचे आधार अपलोड झाले असून साक्री तालुका पिछाडीवर आहे. जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत ९१.६२ टक्के काम झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पूर्वीपेक्षा संख्या घटली, गैरप्रकारांना लागेल चाप
काही विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक एकापेक्षा अधिक शाळांमध्ये नोंदणी केल्याचे आढळले आहे. त्यामुळे अशा आधार क्रमांकातील विद्यार्थ्याचे नाव, जन्म तारखेची पडताळणी केली जाते आहे. ऑगस्ट महिन्यात या प्रकारच्या आधार कार्डची संख्या १ हजार १४६ होती. दोन महिन्यांत १५९ विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक दुरुस्त केला.
कार्ड काढण्यासाठी केंद्रावर गर्दी : विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करण्यासह नवीन कार्ड काढण्यासाठी आधार नोंदणी केंद्रात गर्दी होते आहे. तसेच महाविद्यालयीन व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अपडेटचे काम केवळ ८ टक्केच आहे शिल्लक
पटसंख्या फुगवण्यासाठी एकाच विद्यार्थ्याचा प्रवेश एकापेक्षा अधिक शाळेत दाखवण्याच्या प्रकारांना आधार क्रमांक अपडेट करण्यामुळे लगाम लागणार आहे. त्यामुळे ही मोहीम युद्धपातळीवर राबवण्यात येत आहे. आता फक्त ८.३८ टक्के काम अपूर्ण आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.