आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहरातील रस्त्यांसाठी ३० कोटी मिळाले आहे. त्यातून फक्त देवपूरात रस्त्यांचे काम होणार आहे. त्यामुळे अल्पसंख्यक समाजातील नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत निषेध करून शुक्रवारी झालेल्या महासभेतून काढता पाय घेतला. अन्य भागातील रस्त्यांसाठी काही प्रमाणात निधी द्यावा, अशी मागणी एमआयएम व समाजवादी पार्टीच्या नगरसेवकांनी केली. सभेत महापाैर प्रदीप कर्पे यांना विशेष अधिकार देण्याविषयी सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले. दरम्यान, रस्त्याचे काम मनपा यंत्रणेने करावे. ठेकेदारांनी स्थानिक नगरसेवकांना विश्वास घ्यावे, अशी सूचना महापाैर प्रदीप कर्पे यांनी केली.
महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात ही सभा झाली. उपमहापौर अनिल नागमोते, आयुक्त देवीदास टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ उपस्थित होते. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत देवपूर भागातील रस्ते दुरुस्तीसाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्यावर सभेत चर्चा झाली. या विषयाला एमआयएमच्या नगरसेविका नाजीयाबानो पठाण, सईदा अन्सारी, सईद बेग, हीना पठाण, मुख्तार अन्सारी यांच्यासह १७ नगरसेवकांनी विरोध केला. महापौर प्रदीप कर्पे यांना निवेदन दिले. त्यानंतर सर्व १७ नगरसेवकांनी सभात्याग केला. सबंधित नगरसेवकांचा विरोध नोंदवून घेत विषय सभेत मंजूर झाला. शहरातील रस्त्यांच्या कामासाठी शासनाने ३० कोटी मंजूर केले आहे. या निधीतून सर्व भागातील रस्त्यांची कामे करावी, अशी मागणी समाजवादी पक्षासह, एमआयएम व अन्य अल्पसंख्याक समाजातील नगरसेवकांची हाेती. पण भाजपने ३० कोटी देवपूरातील रस्त्यांसाठी देण्याचा निर्णय घेतला.
मुस्लिम बहुल भाग वगळल्याने नाराजी शासनाने मागवलेल्या प्रस्तावात महापालिकेने केवळ देवपूर भागातील रस्त्यांची कामे समाविष्ट केली. त्यातही देवपूरातील प्रभाग क्रमांक तीन मधील इस्लामपुरा, लाला सरदार नगर, मोहम्मदी नगर, खाटीक वाडा, गौसिया नगर, मौला अली नगर, मदनी नगर या मुस्लिम बहुल भागातील रस्ते वगळल्याचा आरोप सभेत झाला. त्यावर सभापती शीतल नवले यांनी सबंधित भागात आठवडाभरात एक काेटीचे काम सुरू होणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
चुकीचे काम हाेणार नाही, याची काळजी : महापाैर सभेत महापौरांना विशेष अधिकार देण्यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले. भाजपचे नगरसेवक सुनील बैसाणे यांनी महापौरांना विशेष अधिकार कशासाठी पाहिजे, असा प्रश्न केला. जळगाव सारखी स्थिती हाेवू शकते, असेही ते म्हणाले. महापौर प्रदीप कर्पे यांच्यावर विश्वास असल्याचे सांगत अधिकार नेमके कशासाठी पाहिजे हे आधी सांगा असेही ते म्हणाले. त्यावर महापाैरांनी चुकीचे काम करणार नाही. केंद्र व राज्य सरकारच्या याेजनातून अनुदान प्राप्त करण्यासाठी विशेष अधिकार हवा असल्याचे ते म्हणाले. चर्चेनंतर विषय मंजुर झाला.
निधी मिळाल्याने केला सत्कार अन् ठरावही रस्त्यांसाठी निधी मिळाल्याने नगरसेविका भारती माळी यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी सहकार्य केल्याने त्यांचे अभिनंदन झाले. देवपूरातील नगरसेवकांनी महापाैर प्रदीप कर्पे यांचा सत्कार केला. सभा संपल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी खासदार डाॅ.सुभाष भामरे यांचाही सत्कार केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.