आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात आठ ते दहा दिवसांनंतर पाणी येत असल्याने शिवसेनेने बुधवारी कावड यात्रा आंदोलन केले. आयुक्त देविदास टेकाळे यांच्या दालनात ठिय्या दिला. जलस्रोतांमध्ये मुबलक पाणी व व ७ नवे जलकुंभ असतानाही वेळेवर पाणी का मिळत नाही असा प्रश्न उपस्थित केला. आगामी काळात नियमित पाणी मिळाले नाही तर अधिकाऱ्यांना दालनात बसू देणार नाही, असा इशारा दिला. चर्चेनंतर प्रशासनाने पाच दिवसाआड पाणीपुरवठा करू असे लेखी आश्वासन दिले.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृत्रिम पाणीटंचाईच्या निषेधार्थ कावड तयार केल्या. त्यावर तापी, हरणमाळ, नकाणे, डेडरगाव तलाव असे लिहून या कवाड पदाधिकाऱ्यांनी खांद्यावर आयुक्त टेकाळे यांच्या दालनात आणल्या. पण आयुक्त दालनात नव्हते. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशी चर्चा करावी असे पोलिसांनी सांगितले. पण शिवसेना पदाधिकारी आयुक्तांशी चर्चा करण्यावर ठाम होते. त्यांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले. काही वेळेत आयुक्त देविदास टेकाळे आले.
त्यांच्यावर पदाधिकाऱ्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. पाण्याचे त्वरित नियोजन करावे, अशी मागणी केली. या वेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख डाॅ. तुळशिराम गावित, अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख मनोज मोरे, सतीश महाले, जिल्हा समन्वयक धीरज पाटील, विधानसभा संघटक डॉ. सुशील महाजन, समन्वयक भरत मोरे, संघटक संजय वाल्हे, राजेश पटवारी, गुलाब माळी, प्रफुल्ल पाटील, पुरुषोत्तम जाधव, संदीप सूर्यवंशी, विनोद जगताप, नंदलाल फुलपगारे, सुनील पाटील, नाना वाघ आदी उपस्थित होते.
प्रभाग बारामध्येही दूषित पाणी
प्रभाग क्रमांक ११, १२ मध्ये आठ ते दहा दिवसांनंतर दूषित पाणीपुरवठा होत असल्याने या भागातील महिला व नागरिकांनीही अांदोलन केले. याविषयाकडे अभियंता हेमंत पावटे यांनी लक्ष दिले नसल्याचा आरोप केला. अंबिकानगर ते कबीरगंजपर्यंत जलवाहिनीला गळती लागल्याने दूषित पाणी येते असा आरोप झाला. आयुक्त देविदास टेकाळे यांनी पाहणी करण्याचे आदेश दिले.
प्रशासनाचे लेखी आश्वासन : तापी योजना दुरूस्तीसाठी बंद असल्याने दोन दिवस पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे नियोजन विस्कळीत झाल्याचा मनपा प्रशासनाने केला. तसेच येत्या काळात शहरात पाच दिवसानंतर पाणीपुरवठा करू असे लेखी आश्वासन दिले.
घरावर मोर्चे येतात, नियोजन करा
आठ ते दहा दिवसांनंतर पाणी येते. काही भागात दूषित पाणीपुरवठा होतो. त्यामुळे महापौर, स्थायी समिती सभापती, आयुक्तांनी उपाययोजना करावी, अशी मागणी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी पत्राद्वारे केली आहे. उशिरा पाणी येत असल्याने नगरसेवकांच्या घरावर मोर्चे येत आहे. त्यामुळे हा विषय मार्गी लावावा, अशी मागणी कदमबांडे यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.