आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५ टक्के प्रवेशाची असलेली प्रतिक्षा आता संपली आहे. १ मार्चपासून विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. १७ मार्च पर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी करता येणार आहे. यावर्षी देखील राज्यस्तरावरुन एकच सोडत जाहीर होणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे यांनी दिली आहे. मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत खासगी विनाअनुदानीत शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के प्रवेशासाठी गेल्या काही दिवसा पासुन पालकांना प्रतिक्षा लागुन होती.ही प्रतिक्षा संपली आहे.
१ ते १७ मार्चपर्यंत पालकांना आरटीई पोर्टलवर ऑनलाइन अर्जाची मुदत आहे. यंदा प्रवेशासाठी राज्यस्तरावरून एकच सोडत जाहीर होईल. सोडतीनंतर प्रत्यक्ष प्रवेशासाठी एक नियमित फेरी राबवली जाईल. या फेरीमध्ये संधी मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी टप्प्याटप्प्याने प्रतीक्षा यादीनुसार चार फेऱ्या राबवल्या जाणार आहेत.प्रवेश अर्ज करताना पालकांना दहा शाळांची निवड करता येणार आहे. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.जिल्ह्यातील ९३ शाळांमध्ये यंदा २५ टक्के अंतर्गत १ हजार ६ जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिले जाणार आहे.
प्रवेशासाठी हे अनिवार्य : वंचित गटातील मुलांच्या प्रवेशाकरिता वार्षिक कमाल उत्पन्नाची मर्यादा लागू नाही. तर एक लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो. प्रवेशाकरिता १० शाळांची निवड करावी. अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता तो बलून जास्तीत जास्त ५ वेळाच निश्चित करता येईल, याची नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे.
प्रवेशासाठी हे कागदपत्रे आवश्यक
निवासी पुराव्याकरिता रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायन्सस, वीज देयक, टेलिफोन, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेच पासबूक यापैकी एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. स्वत:च्या मालकीचे घर नसल्यास दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असलेला भाडेकरार ग्राह्य धरण्यात येईल. जन्मदाखला, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, दिव्यांग मुलासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र, आधारकार्ड यांसह इतर आवश्यक कागदपत्रे अनिवार्य असतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.