आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा न्यायालयात शनिवारी झालेल्या लोकअदालतीमध्ये १ हजार ४९८ खटले निकाली निघाले. शिवाय ५ कोटी ४१ लाखांचा भरणा झाला. तडजोड स्वरूपातील खटल्यांमध्ये कौटुंबिक वादही होते. त्यातील असाच सुमारे १० वर्षांपासून प्रलंबित असलेला खटला निकाली निघाला. त्यानंतर तक्रारदार महिला पतीसह सासरी रवाना झाली.
शहरात जिल्हा न्यायालयाच्या आवारात तर तालुकास्तरावर तालुका न्यायालयात शनिवारी लोकअदालत झाली. त्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाने आवश्यक तयारी केली होती. सकाळपासून तक्रारदार, पक्षकारांची गर्दी झाली होती. लोकअदालतीत तडजोड स्वरूपातील ११ हजार ४४४ खटले होते. त्यापैकी १ हजार ४९८ खटले निकाली निघाले. याशिवाय वित्त संस्था, बँक, ग्रामपंचायत, वीज वितरण कंपनीचे खटलेही निपटाऱ्यासाठी होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा सत्र न्या. आर.एच. मोहंमद यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालत झाली. लोकअदालतीत जास्तीत जास्त खटले निकाली निघावे यासाठी प्रयत्न करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ.डी.यू. डोंगरे यांनी दिली. लोकअदालतीत सुमारे सुमारे ५ कोटी ४१ लाख रुपये वसूल झाल्याची माहिती देण्यात आली.
तृतीयपंथींना सन्मान
लोकअदालतसाठी तीन पॅनल होते. पॅनल समोर तडजोड केली जात होती. पॅनलच्या सदस्यांमध्ये तृतीयपंथी पार्वती जोगी, शुभांगी पवार व स्वरा या तिघांचा समावेश होता. तिघांनी भूमिकेला न्याय दिला.
विविध संस्थांच्या तक्रारी
लोकअदालतमध्ये बँक, वीज कंपनी, ग्रामपंचायत तसेच खासगी बँक व वित्त संस्थाच्या तक्रारीही हाेत्या. आरोप असलेल्या व्यक्तींना बोलवण्यात आले.
न्यायाधीशांचाही सत्कार
लताबाई व मच्छिंद्र या दाम्पत्यात १० वर्षांपासून कौटुंबिक वाद होता. न्या. एस. सी. पठारे, सदस्य गंभीर बोरसे महाराज, अॅड. केवल नांदोडे यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर दहा वर्षांनी पुन्हा त्यांचा संसार फुलणार आहे. त्याबद्दल कौटुंबिक न्यायालयाचे न्या. देवेंद्र उपाध्ये, विधी सेवा प्राधिकरणाचे न्या. डॉ. दीपक डोंगरे यांचा सत्कार झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.