आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठ्याचे नियोजन:आठ दिवसांनंतर मिळेल चार दिवसांआड पाणी; डेडरगाव ओसंडला

धुळे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तापी नदीला पूर आल्याने पाण्यात मातीचे प्रमाण वाढले होते. त्याचा परिणाम तापी पाणीपुरवठा योजनेवर लाभ झाला होता. जलशुद्धीकरणाची प्रक्रिया मंदावली हाेती. तसेच तापी योजनेचे दोनच पंप सुरू होते. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले. पण आता सुलवाडे बॅरेजचे दरवाजे बंद झाले आहे. तसेच तापी योजनेंतर्गत चार पंप सुरू झाले आहे. त्यामुळे आठ दिवसांनंतर चार दिवसांआड पाणीपुरवठ्याचे नियोजन आहे. तसेच डेडरगाव तलाव तुडुंब भरला आहे.

शहराच्या ७० टक्के भागाला तापी योजनेतून पाणीपुरवठा होतो. पण तांत्रिक कारणामुळे अनेकवेळा नियोजित वेळेपेक्षा उशिरा पाणीपुरवठा होतो. त्याच गेल्या महिन्यात तापी नदीला पूर आला होता. त्यामुळे गाळमिश्रित पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने जलशुद्धीकरणाला वेळ लागतो आहे. तसेच दोनच पंप सुरू असल्याने जलकुंभ भरण्यास उशीर होत असल्याने शहरात ७ ते ८ दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो आहे. पण आता तापी नदीवरील सुलवाडे बॅरेजचे दरवाजे बंद झाले आहे. त्यामुळे पाणी वाहणे थांबले असून, गाळ खाली बसतो आहे. तसेच बाभळे जलशुद्धीकरण केंद्रात चार पंप सुरू झाले आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण वेगात होते आहे. त्यामुळे आठ दिवसांनंतर शहरात ३ ते ४ दिवसांआड पाणीपुरवठा होईल. पांझरा नदी पुन्हा दुथडी भरून वाहत असल्याने हनुमान टेकडी जलशुद्धीकरण प्रकल्पात पांझरा नदीचे पाणी उचलले जाते आहे.

नकाणे तलावात अद्याप निम्माही साठा नाही
शहरासह परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे डेडरगाव तलाव भरला. या तलावाची क्षमता १२० एमसीएफटी आहे. तलावातून मोहाडी उपनगर व चितोड भागात पाणीपुरवठा होतो. दुसरीकडे शहराच्या ३० टक्के भागात पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव अद्याप भरला नाही. तलावाची क्षमता ३५० एमसीएफटी असून सद्य:स्थितीत १४० एमसीएफटी जलसाठा झाला आहे. या तलावाच्या वरील बाजूस हरणमाळ तलाव असून त्यात अक्कलपाडा धरणाच्या पाटचारीतून पाणी सोडण्यासाठी महापालिकेने गेल्या आठवड्यात पाटबंधारे विभागाला पत्र दिले आहे.

नवरंग जलकुंभावरून होणार पाणीपुरवठा
देवपूर परिसरातील नवरंग जलकुंभाजवळ नवीन जलकुंभ बांधण्यात आला आहे. या जलकुंभातून येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा सुरू केला जाईल. त्यामुळे देवपूर दत्त मंदिर परिसरात पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. दरम्यान, पाणीपुरवठा योजनेंतर्गत विविध भागात जलकुंभ बांधण्यात आले असून, त्यातून अद्याप पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.

बातम्या आणखी आहेत...