आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:अक्कलपाडा योजना 90  टक्के पूर्ण; समस्या सोडवू

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी वकिलांनी मनपाला ४५ दिवसांची मुदत दिली हाेती. ती लवकरच संपेल. या पार्श्वभूमीवर सोमवारी वकील संघात बैठक झाली. या वेळी महापौर प्रदीप कर्पे यांनी भूमिका मांडली. बैठकीत वकिलांनी महापौरांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

या वेळी महापौरांनी कचरा व्यवस्थापन व अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम ९० टक्के झाले असून, रस्त्यांसाठी ३० कोटींचा निधी मिळाल्याचे सांगितले. तसेच उर्वरित समस्या सोडवण्यासाठी १० जानेवारीपर्यंत मुदत द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर वकील संघाने मनपाला सुविधा पुरवण्यासाठी पुन्हा २२ दिवसांची मुदत दिली आहे.

बैठकीला वकील संघाचे अध्यक्ष अॅड. आर.डी. जोशी, सचिव अॅड. मधुकर भिसे, अॅड. रसिका निकुंभ, अॅड. एम.एस. पाटील, अॅड. श्यामकांत पाटील, अॅड. जितेंद्र निळे, अॅड. आनंद जगदेव आदी उपस्थित होते. महापौर कर्पे म्हणाले की, वकील संघाने दिलेल्या ४५ दिवसांच्या मुदतीत आश्वासनाप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न केला. कचरा संकलनाची समस्या ९० टक्के सुटली आहे. पाचकंदील व तहसील कार्यालयाजवळील काही विक्रेते रात्री रस्त्यावर कचरा फेकतात. त्यामुळे या भागात रात्री सफाई केली जाते.

घंटागाडी नियमित सुरू आहे. अक्कलपाडा पाणी योजनेचे काम वेगात सुरू आहे. पाच वकीलांच्या शिष्टमंडळाने या कामाची पाहणी करावी. जलवाहिनीच्या कामासाठी सात शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. पाच शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याची तयारी दाखवल्याचे ते म्हणाले. रस्त्यासाठी ३० कोटी मंजूर झाले असून, लवकरच देवपुरात काम सुरू होईल. मनपाला शंभर कर्मचाऱ्यांची भरती करण्यास मंजुरी मिळाली आहे. खड्डे बुजवण्यासाठी निविदा काढावी लागेल. त्यामुळे १० जानेवारीपर्यंत मुदत द्यावी, अशी मागणी महापौर कर्पे यांनी केली आहे.

जलकुंभातून पाणी मिळावे
शहरात विकास कामांसाठी किती निधी आला, कसा खर्च झाला, कामाची गुणवत्ता याविषयी तपासणी करणे आवश्यक आहे. नऊ जलकुंभ बांधून तयार असून, त्यांचा वापर सुरू करावा. मनपाला समस्या सोडवण्यासाठी १० जानेवारीपर्यंत मुदत आहे. -अॅड. आर. डी. जोशी, अध्यक्ष: वकील संघ

बातम्या आणखी आहेत...