आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील रस्त्यांवर वारंवार पडणारे खड्डे, पार्किंगची समस्या, नियमबाह्य गतिरोधक, पाणीपुरवठा योजनेतील त्रुटींसह अन्य समस्या सोडवण्यासह मार्गदर्शक सूचनांसाठी अभ्यास गट स्थापन करावा. यापूर्वी त्रिसदस्यीय समितीने शिफारसी दिल्या आहे. त्यांची अंमलबजावणी करावी, अशी सूचना महापालिकेत मंगळवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली.
मनपात नागरी हक्क संरक्षण समितीची बैठक झाली. या वेळी महापौर प्रदीप कर्पे, आयुक्त देविदास टेकाळे, समितीचे महेश घुगे, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता हिरालाल ओसवाल, प्रभाकर पाटोळे, डॉ. जगदीश गिंदोडिया उपस्थित होते. सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता हिरालाल सोनवणे म्हणाले की, मनपाने नागरी समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना सूचवण्यासाठी यापूर्वी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली होती. समितीने पाणीपुरवठा योजनेत त्रुटी दर्शवल्या होत्या. तसेच भूमिगत गटारीच्या कामातही काही बदल सुचवले हाेते. विकास कामांचे सर्वेक्षण करणारी संस्था व काम करणारा ठेकेदार वेगवेगळा असतो. त्यामुळे दोघांचा ताळमेळ बसत नाही. याविषयाकडे लक्ष द्यावे. शहरातील जलवाहिन्यांची माहिती पाणीपुरवठा विभागाला नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, पार्कीग, खड्डे आदी समस्या सोडवण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा एक अभ्यास गट स्थापन करावा असेही ते म्हणाले. महापौर प्रदीप कर्पे म्हणाले की, समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असून नागरी हक्क संरक्षण समितीला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असेही ते म्हणाले. या वेळी समितीतर्फे महापौरांना निवेदन देण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.